Type Here to Get Search Results !

आकर्षक क्रमांक हवाय... ? दुचाकी वाहनांसाठी आकर्षक नोंदणी क्रमांकासाठी अर्ज करण्याचे आवाहन


आकर्षक क्रमांक हवाय... ? दुचाकी वाहनांसाठी आकर्षक नोंदणी क्रमांकासाठी अर्ज करण्याचे आवाहन

सोलापूर : दुचाकी वाहनांसाठी सुरु होणाऱ्या MH-13 EJ मालिकेतील आकर्षक  नोंदणी क्रमांक राखून ठेवण्याकरिता अर्ज स्विकारण्याबाबत प्रक्रिया सुरु करण्यात आली असून, दुचाकी वाहनांसाठी आकर्षक नोंदणी क्रमांकासाठी अर्ज करण्याचे आवाहन प्रादेशिक परिवहन अधिकारी अर्चना गायकवाड यांनी केले आहे.

वाहनांची नवीन मालिका चालू होण्याच्या दिवशी प्रादेशिक परिवहन कार्यालयात गर्दी होते. त्यामुळे कार्यालयीन व्यवस्थेवर त्याचा ताण पडतो व नागरिकांनाही याचा त्रास होतो. नागरिकांना होणारा त्रास कमी व्हावा व त्यांना हवा असणारा आकर्षक नोंदणी क्रमांक उपलब्ध असल्यास त्यांना सुलभतेने मिळावा. यासाठी ज्या दुचाकी वाहन मालकांना आकर्षक तसेच पसंतीचे क्रमांक विहीत शुल्क भरून हवे असतील त्यांनी दिनांक २२ ते २७ डिसेंबर २०२३ या कालावधीत कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी सकाळी ११.००ते सायं ०५.०० या वेळेत विहीत नमुन्यातील अर्ज सादर करावा. कार्यालयाच्या नवीन नोंदणी विभागात डीडी, पत्याचा पुरावा, ओळखपत्र, पॅनकार्डच्या साक्षांकित प्रतीसह जमा करावा, डीडी फक्त " Dy R.T.O. SOLAPUR यांच्या नावे नॅशनलाईज अथवा शेड्युल्ड बँकेचा असावा.अर्जासोबत पत्त्याच्या पुराव्याची साक्षांकित प्रत सादर करणे आवश्यक असेल.

एक नंबरकरिता एकापेक्षा जास्त अर्ज आल्यास त्यांची यादी दिनांक २७ डिसेंबर २०२३ रोजी सायं. ०५.०० वाजता कार्यालयीन नोटीस बोर्डवर लावण्यात येईल.  यादीतील अर्जदारांना लिलावाकरिता जर जास्त रक्कमेचा डीडी जमा करावयाचा असेल त्यांनी, २८ डिसेंबर २०२३ रोजी  सीलबंद लिफाफ्यात दुपारी ०३.०० वाजेपर्यंत कार्यालयीन वेळेत जमा करावा. लिलावासाठी सादर केलेला डीडी ३०० रुपयेपेक्षा कमी रकमेचा नसावा. दिनांक २८ डिसेंबर २०२३ रोजी दुपारी ०४.०० वाजता प्रादेशिक परिवहन अधिकारी, सोलापूर यांच्या उपस्थितीत संबंधित अर्जदारासमोर लिफाफे उघडून ज्या अर्जदाराचे विनिर्दिष्ट शुल्कापेक्षा जास्तीत जास्त रकमेचा डीडी सादर केला असेल त्यास नमूद पसंती क्रमांक वितरीत केला जाईल.

एकदा राखून ठेवलेला नोंदणी क्रमांक बदलून देता येणार नाही. नोंदणी क्रमांक राखून ठेवलेल्या दिनांकापासून ३० दिवसांच्या आत नोंदणीसाठी वाहन सादर करून वाहन क्रमांक प्राप्त करून घ्यावा, अन्यथा राखून ठेवलेला नोंदणी क्रमांक आपोआप रद्द होईल व फी सरकारजमा होईल. कोणताही विशिष्ट नोंदणी क्रमांक राखीव ठेवण्यासाठी प्रदान केलेली फी कोणत्याही परिस्थितीत परत करता येणार नाही अथवा त्याचे समायोजन करता येणार नाही, असेही प्रादेशिक परिवहन अधिकारी अर्चना गायकवाड यांनी पत्रकान्वये  कळविले आहे