शासनाची फसवणूक करून केली रखवालदारी
सोलापूर : शासनाची फसवणूक करून रखवालदारी केल्याचा किस्सा सोलापुरात पुढे आलाय. रविराज सिद्राम कोमल्लु यांनी दाखल केलेल्या फिर्यादीनुसार सदर बाजार पोलिसांनी कृष्णा नागेश कोरे (रा. सोलापूर) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला असल्याचे सांगण्यात आलंय.
याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, कृष्णा कोरे यांनी अनुकंपा तत्वावर नोकरी मिळविण्याच्या उद्देशाने, खोटी कागदपत्रे सोलापूर महानगरपालिकेकडे सादर करून रखवालदारी ची नोकरी मिळवली. कृष्णा कोरे यांनी नगर अभियंता कार्यालयात रखवालदार म्हणून सेवा सुरू केली. त्यानंतर त्याने खोटी कागदपत्रे सादर करून अनुकंपा तत्वावर रखवालदारीची नोकरी मिळविल्याची खात्री पटल्यावर रविराज कोमलु यांनी पोलिसांकडे धाव घेतली.
सदर बझार पोलिसांकडे दाखल करण्यात आलेल्या फिर्यादीनुसार खोटी कागदपत्रे सादर करून त्याव्दारे नगर अभियंता कार्यालयात कृष्णा कोरे याने रखवालदार या पदावर नियुक्ती मिळवून स्वतःचे आर्थिक फायद्यासाठी २५ ऑक्टोबर २०२२ ते आजतागायत प्रती महिना ४, ४४० रूपये शासकीय वेतन घेत एकूण ५३,९९६ रूपये घेऊन शासनाची फसवणूक केलीय. त्यानुसार त्याच्याविरुद्ध भादविसं ४१७,४१९,४२० प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलाय. मसपोनि भांबिष्टे या गुन्ह्याचा अधिक तपास करीत आहेत.