राज्य उत्पादन शुल्क विभागाचे हातभट्ट्यांवर छापे
०९ गुन्ह्यात ०५.३१ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त
सोलापूर : राज्य उत्पादन शुल्क विभागाने मंगळवारी मुळेगाव तांडा, बक्षीहिप्परगा तांडा, सेवालाल नगर, मार्डी या हातभट्टी ठिकाणांवर टाकलेल्या धाडीत ०९ गुन्ह्यात ४५० लिटर हातभट्टी दारू सह ०५, ३१, ७०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला.
सविस्तर वृत्त असे की, मंगळवारी, १९ डिसेंबर रोजी, राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकांनी दक्षिण सोलापूर तालुक्यातील मुळेगांव तांडा व बक्षीहिप्परगा तांडा या ठिकाणी पहाटेच्या सुमारास टाकलेल्या धाडीत ०४ गुन्हे नोंदविण्यात आले. अंधाराचा फायदा घेऊन हातभट्टी ठिकाणाहून आरोपी फरार झाले असून या कारवाईत चौदा हजार दोनशे लिटर रसायनासह ०३, ३२, ६०० रुपये किमतीचा मुद्देमाल विभागाने जप्त केला.
याच मोहिमेदरम्यान निरीक्षक भरारी पथक सुनील कदम यांच्या पथकाने सेवालाल नगर तांडा मार्डी (ता.उत्तर सोलापूर) येथील पंडित नारायण वडजे याच्या घरातून एका प्लास्टिक बॅरलमध्ये साठवून ठेवलेली शंभर लिटर हातभट्टी दारू जप्त करून गुन्हा नोंदवला. सदर आरोपी फरार असून त्याचा शोध सुरू आहे.
निरीक्षक ब विभाग सदानंद मस्करे यांच्या पथकाने पिंटू भिलू वडजे (रा. सेवालाल नगर, मार्डी, ता.उत्तर सोलापूर) मध्ये येथे राहते घरातून रबरी ट्यूब व प्लास्टिक बॅरल मध्ये साठवून ठेवलेली २०० लिटर हातभट्टी दारू व ११ प्लास्टिक पोत्यांमध्ये साठवून ठेवलेली गुळ पावडर असा एकूण २४ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. या गुन्ह्यातील आरोपी पिंटू वडजे हा फरार असून त्याचाही शोध सुरू आहे.
दुय्यम निरीक्षक रोहिणी गुरव यांच्या पथकाने सेवालाल नगर तांडाच्या दक्षिणेस सरकारी ओढ्याच्या काठी असलेल्या विहिरीजवळ अमोल चित्रसेन राठोड हा इसम हातभट्टी दारु गाळत असल्याचे आढळून आल्याने त्याचेविरुद्ध गुन्हा दाखल केला. त्याच्या ताब्यातून १७५० लिटर रसायन व इतर साहित्य असा एकूण ४० हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला. राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकांनी मिसाळ वस्तीच्या उत्तरेस विहिरीच्या बाजूला सेवालाल नगर येथे दोन हातभट्टी ठिकाणांवर धाडी टाकून १८५० लिटर रसायन व १५० लिटर हातभट्टी दारूसह दोन मोटरसायकली असा एकूण ०१, २९, ७०० रूपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला.
ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक नितीन धार्मिक यांच्या नेतृत्वाखाली उप अधीक्षक गुणाजी क्षीरसागर, निरीक्षक सदानंद मस्करे, दुय्यम निरीक्षक उषाकिरण मिसाळ, कृष्णा सुळे, अक्षय भरते, रोहिणी गुरव, शिवकुमार कांबळे, सुरेश झगडे, मानसी वाघ, सहायक दुय्यम निरीक्षक मुकेश चव्हाण, गजानन होळकर, अलीम शेख, जवान किरण खंदारे, शोएब बेगमपुरे, प्रशांत इंगोले, चेतन व्हनगुंटी, अनिल पांढरे, इस्माईल गोडिकट, अण्णा कर्चे, आनंदराव दशवंत, योगीराज तोग्गी, अशोक माळी, वाहनचालक रशीद शेख, संजय नवले व दीपक वाघमारे यांच्या पथकाने पार पाडली.
आवाहन
राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून हातभट्टी दारु विरुद्ध सातत्याने मोहिमा राबविण्यात येत असून नागरिकांना आवाहन करण्यात येते की, त्यांच्या परिसरात हातभट्टी दारूची निर्मिती, विक्री किंवा वाहतूक होत असल्यास या विभागास संपर्क साधावा, बातमीदाराचे नाव गोपनीय ठेवण्यात येईल.