व्यावसायिकतेचं स्वरूप : सिने अभिनेते अली खान
सोलापूर : हल्ली विविध क्षेत्रात अनेक बदल होत आहेत. आज तंत्रज्ञानाच्या मदतीनं कठीण कामं सोपी झाली आहेत. त्यास चित्रपट सृष्टीही अपवाद नाही. कालपर्यंत चित्रपट नावलौकिकासाठी तयार होत होते. जनसामान्यांची पसंती हे यश म्हणून पाहिलं जात होते. आज चित्रपटाने केलेल्या उत्पन्नावर चित्रपटाचं यश- अपयश ठरते. बदलत्या काळात चित्रपट क्षेत्राला व्यावसायिकतेचं स्वरूप आल्याचे सिने अभिनेते अली खान यांनी म्हटले.
सिने अभिनेते अली खान, एका कार्यक्रमाच्या निमित्तानं शुक्रवारी सोलापुरात आले होते. त्यावेळी त्यांच्याशी संवाद साधला. या भेटीत त्यांना चित्रपट प्रवासाविषयी विचारलं असता, कालका चित्रपटातील पदार्पणानंतर अनेक चित्रपट आणि मालिकांमध्ये काम करण्याची संधी मिळाली. दूरदर्शनवर २५ वर्षापूर्वी आलेल्या महाभारत मालिकेतील ' यक्ष ' आणि दि स्वोर्ड ऑफ टिपू सुलतान मालिकेतील टिपूंच्या काकाच्या भूमिकेतून बरच काही शिकायला मिळालं, असं त्यांनी प्रारंभी सांगितले.
रुपेरी पडद्याचं आकर्षण प्रारंभापासून होतं, बिहारच्या गयाहून सिनेसृष्टीत नायक होण्याचं स्वप्न उराशी बाळगून मुंबईत पाऊलं ठेवलं होते, अभिनय साकारण्याची संधी मिळत गेली, मोठ्या अन् छोट्या पडद्यावर आपल्या भूमिकेशी प्रामाणिक राहताना, नायकाचा ' व्हिलन ' कधी झालो, हे कळलं नाही. अनेक वेळा नकारात्मक भूमिका मिळाल्या, मात्र खरी ओळख ' खुदा गवाह ' मधील हबिबुल्लाह या व्यक्तिरेखेने दिली. ज्याचं चित्रीकरण राजस्थान आणि अफगाणिस्तानमध्ये झालं होतं, ही आठवणही सांगितली.
पूर्वी चित्रपट तयार होत असताना निर्माते, दिग्दर्शक, कलाकार, कथा-पटकथा, गीतकार, संगीतकार या सर्वांना प्रचंड मेहनत घ्यावी लागायची, कालावधी अधिक लागायचा, मात्र बदलत्या काळात चित्रपट क्षेत्रातील गुंतवणूक आणि उत्पन्न या समिकरणामुळं व्यावसायिकतेचं स्वरूप आलं. हल्लीच्या नव-नव्या तंत्रज्ञानांमुळे कमीत- कमी वेळेत चित्रपट प्रदर्शनासाठी तयार होतात. चित्रपट समाजात बदल घडवून आणतात. याकडे सकारात्मक म्हणून पाहिले पाहिजे. चित्रपटांमधून खूप काही शिकण्यासारखे आहे. प्रत्येक चित्रपट काही ना काही संदेश देतो. चित्रपटातून प्रेक्षकांनी शिकण्याची गरज आहे, असंही विचारलेल्या एका प्रश्नाला अभिनेते अली खान यांनी सांगितले.
'खुदा गवाह ', नंतर सरफरोश, कोहराम यांसारख्या चित्रपटांतून प्रसिद्धीस आलेले अभिनेते अली खान यांनी, त्यांच्या आतापर्यंतच्या कारकिर्दीत देशातील बॉलिवूड बरोबरच देशातील वेगवेगळ्या भाषेतील दीडशेहून अधिक चित्रपटांमध्ये काम केले. त्यांना हॉलिवूडमध्येही संधी मिळाली, त्या-त्या भूमिकेलाही कलाकार म्हणून योग्य न्याय देण्याचा प्रयत्न केला. सर्वांसाठी कटू आठवणी मागे ठेऊन गेलेल्या कोरोनाच्या दोन वर्षानंतर बॉलिवूड इंडस्ट्रीत अभिनेते अली खान यांनी पुन्हा एकदा कामाला सुरुवात केलीय, असेही त्यांनी सांगितले.
ते अलीकडेच शाहरुख खानच्या पठाण चित्रपटामुळे चर्चेत आले. त्यांनी, ‘खरक मंझिल’ या नव्या चित्रपटात नायकाच्या वडिलांची मुख्य भूमिका साकारली आहे.कोणत्याही क्षेत्रात कार्य करीत असताना, प्रत्येकानं आपापल्या कामाशी प्रामाणिक राहून परिश्रम करावं,यश निश्चित मिळतं, असंही त्यांनी शेवटी सांगितले.
........... चौकट ...........
... तर वृध्दाश्रम संकल्पना
संपुष्टात येईल : अली खान
आपण समाजाला कोणता संदेश देता असं विचारलं असता, देशातील वाढत्या द्वेषाबद्दल खंत व्यक्त करताना, हे देशासाठी चांगले नाही. माणसाने माणसांवर प्रेम केले पाहिजे. कोणी कोणत्याही जनसमुहातून आला तरी, देश प्रथम म्हणून पुढं आलं पाहिजे. प्रत्येकानं आपल्या आई-वडिलांची प्रथम कर्तव्य समजून सेवा केली तर वृध्दाश्रम संकल्पना संपुष्टात येईल, असा सल्ला आजच्या तरुणाईला देताना, त्या भावनावरील दृढविश्वास अली खान यांनी व्यक्त केला.