जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची मंगळवारी महत्त्वपूर्ण बैठक : जिल्हाध्यक्ष साळुंखे-पाटील
सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा विस्तार आणि पक्ष संघटन अधिक मजबूत करण्यासाठी मंगळवारी, १९ डिसेंबर रोजी सोलापूर येथील रंगभवन येथे दु ०२ वा. महत्त्वपूर्ण बैठक आयोजित केली असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेस ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार दिपकआबा साळुंखे पाटील यांनी दिली.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदी माजी आमदार दिपकआबा साळुंखे पाटील यांची नियुक्ती झाल्यानंतर पक्षाची ही जिल्ह्यातील पहिलीच बैठक आहे. राज्यात झालेल्या ऐतिहासिक राजकीय घडामोडीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसची ही सोलापूर जिल्ह्यातील पहिलीच बैठक असल्याने या बैठकीकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले आहे.
या बैठकीत सोलापूर जिल्ह्यातील पक्ष संघटना मजबूत करणे व वाढविणे बाबत विचार विनिमय करणे, सोलापूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नूतन पदाधिकारी निवड करणे बाबत विचारविनिमय करणे, उपमुख्यमंत्री अजित पवार व प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्यासह वरिष्ठ नेतेमंडळी व पदाधिकारी यांचा सोलापूर जिल्हा संपर्क दौरा आयोजित करण्याबाबत चर्चा करणे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी नूतन कार्यालयाच्या उद्घाटन सोहळ्याची तारीख व वेळ याचे नियोजन ठरविणेबाबत विचार विनिमय करणे, पदाधिकाऱ्यांच्या अडीअडचणी जाणून घेणे यांसह इतर महत्त्वपूर्ण विषयावर मंगळवारी होणाऱ्या बैठकीत चर्चा केली जाणार आहे.
मंगळवार, १९ डिसेंबर रोजी आयोजित राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीस सोलापूर जिल्ह्यातील पक्षाच्या सर्व नेतेमंडळींनी तसेच पक्षाच्या आजी-माजी पदाधिकाऱ्यांनी वेळेत उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हाध्यक्ष दिपकआबा साळुंखे पाटील यांनी केले आहे.