अमानुष अन् क्रूरतेची परिसीमा ओलांडली !
टेंभुर्णी : वाद-विवादात कधीच कोणाचा कल्याण होत नाही, असं नेहमीच म्हटलं जातं. तरीसुद्धा समाजात वादविवाद, तंटे -बखेडे नेहमीच पाहायला मिळतात. त्यात भावकीचा वाद म्हटलं की, तो कधी कोणत्या टोकाला जाईल, याचा नेम नसतो. अशीच अमानुष अन् क्रूरतेची परिसीमा ओलांडणारी घटना माढा तालुक्यात सोमवारी, ११ डिसेंबर रोजी घडलीय. शेतीच्या वादातून भावकीतील चौघांनी एका ६५ वर्षीय वृध्दाची कुऱ्हाडीने मुंडके तोडून, मृताचे शिर घेऊन ते फरारी झाले. या घटनेनंतर भयाचं वातावरण पसरलंय.
शेवरे गावच्या हद्दीतील कुरणवस्ती येथे शेतीच्या कारणावरुन जाधव परिवारात भांडण होते. त्यातूनच ही क्रूरतेची परिसीमा ओलांडणारी घटना घडलीय. ६५ वर्षीय वृद्धाचा भावकीतील चौघा जणांनी कुऱ्हाडीने शिर तोडून धडावेगळे केले, हा थरारक प्रकार सोमवारी सकाळी १०.३० वा. च्या सुमारास घडला. संशयितांनी मृताचं धड घटनास्थळी टाकून शिर घेऊन घटनास्थळावरून पलायन केलंय.
शंकर जाधव यांची अमानुष व क्रूर पद्धतीने हत्या झाल्याने पंचक्रोशीत भीतीचे वातावरण पसरलं आहे. याबाबत नरहरी नवनाथ बंडलकर (रा.शेवरे) यांनी टेंभुर्णी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. पोलीस निरीक्षक दीपक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक जोग या गुन्ह्याचा अधिक तपास करीत आहे