सोलापूर : श्री अन्न उत्कृष्टता केंद्र सोलापूर येथे सुरू करण्यासाठी प्रारंभापासूनच शासनाकडे शर्तीचे प्रयत्न सुरू होते. त्याकरिता शासनास विविध पातळीवर पत्रव्यवहारही सुरू होता. तत्कालीन वित्तमंत्री तथा राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ०९ मार्च २०२३ रोजी अर्थसंकल्पात श्री अन्न उत्कृष्टता केंद्र सोलापूरला करणार असल्याची महत्वपूर्ण घोषणा केली. दरम्यानच्या राजकीय घडामोडीनंतर २४ नोव्हेंबर रोजी प्रसिद्ध करण्यात आलेला अध्यादेश रद्द करण्याचे शासन स्तरावर प्रयत्न सुरू असल्याचे आमदार सुभाष देशमुख यांनी सामाजिक माध्यमावर प्रसिद्ध केलेल्या पत्रकात म्हटले आहे.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्पात केलेल्या घोषणाप्रमाणे १७ एप्रिल रोजी श्री अन्न उत्कृष्टता केंद्र सोलापूर येथे होणार असल्याचा शासन निर्णय प्रसिद्ध झाला, हे त्या सर्व प्रयत्नांचे यश होते असे आमदार देशमुख यांनी सांगून, २४ एप्रिल रोजी तत्कालीन वित्तमंत्री तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना श्री अन्न उत्कृष्टता केंद्र दक्षिण सोलापूर तालुक्यातील होटगी येथील शासनाच्या उपलब्ध जागेवर केंद्र होण्यासंबंधी शासनाला पत्र दिले होते, असं त्या पत्रकात म्हटलं आहे.
त्यानंतर हे श्री अन्न उत्कृष्टता केंद्र, २४ नोव्हेंबर रोजीच्या शासन अध्यादेशानुसार ते बारामतीला हलविण्यात आल्याचे जनसामान्यासमोर आले. तेव्हापासून सोलापूरचे केंद्र बारामतीला पळविल्याने राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर टीकेची झोड उठवली आहे. सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या हिताचा प्रकल्प बारामतीला पळविल्याने काँग्रेस (आय) पक्ष पदाधिकाऱ्यांनी आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. तत्पूर्वी संभाजी आरमार चे संस्थापक श्रीकांत डांगे आणि संभाजी आरमार च्या पदाधिकाऱ्यांनी एकत्र येऊन, गुरुवारी सायंकाळी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर 'त्या ' आदेशाची होळी केली.
सोलापूर जिल्ह्यासाठी मंजूर झालेला श्री अन्न उत्कृष्टता केंद्र प्रकल्प सोलापूर जिल्ह्यातच व्हावा, अशी जिल्ह्यातील शेतकऱ्यांबरोबर विरोधी पक्षांच्या नेतेमंडळींची भूमिका आहे. त्यासाठी २४ नोव्हेंबर रोजीचा ADT संस्था, बारामती यांचा निघालेला शासन निर्णय तात्काळ रद्द करून सोलापूर येथे ते काम तातडीने होटगी येथील शासनाच्या जागेवर सुरु करण्यासंबंधी पत्र पाठवून दिल्याचे आमदार सुभाष देशमुख यांनी सांगितले.