सोलापूर : येथील विजापूर रस्त्यावरील पनाश अपार्टमेंटमध्ये वीज चोरीची घटना उघडकीस आलीय. वीज चोरीत गुंतलेल्या फ्लॅट धारकाला वीज वितरण कंपनीकडून ६८ हजार रुपयांचा दंड आकारण्यात आला. ही कारवाई गेल्या ०३ दिवसापासून सुरू होती. महेंद्र बाबुराव भोसले (वय ४९, रा. फ्लॅट नं. ६०२, पनाश अपार्टमेंट, विजापूर रोड, सोलापूर) असे कारवाई झालेल्या फ्लॅट धारकाचे नाव आहे.
याबाबतची अधिक माहिती अशी की, विजापूर रोडवरील उच्चभ्रु अपार्टमेंट असा लौकिक असलेल्या पनाश मधील फ्लॅट नं. ६०२ मधील रहिवाशी महेंद्र भोसले यांच्याकडून वीज चोरी केली जात असल्याची लेखी तक्रार वीज वितरण कंपनीच्या वरिष्ठ कार्यालयाकडे प्राप्त झाली. त्यावरून शहर उपकार्यकारी अभियंता कार्यालयाने पनाश मध्ये जाऊन पाहणी केली असता पनाश अपार्टमेंटमधील कॉमन वापरासाठी असलेल्या मीटरला आलेल्या वीज वितरण कंपनीच्या कनेक्शन ला वायर जोडून महेंद्र भोसले यांनी त्यांच्या फ्लॅटमध्ये वीज कनेक्शन चोरून घेतल्याचे आढळून आले.
हे बील भरण्यासाठी ०८ दिवसाची मुदत देण्यात आलीय. वीजेचे बील आणि तडजोड रक्कम भरली नाही, तर फ्लॅट धारक महेंद्र भोसले यांच्याविरूध्द पोलीसांकडे वीज चोरीचा गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचे उपकार्यकारी अभियंता मोरे यांनी सांगितले.
पनाश सारख्या उच्चभ्रु अपार्टमेंट असो की इतर सर्वसामान्यांच्या घरात किंवा कोणत्या उद्योगामध्ये वीज चोरी होत असेल तर नागरीकांनी माहिती द्यावी, वीज वितरण कंपनीकडून त्वरीत कारवाई करण्यात येईल, असेही मोरे यांनी सांगितले.