अपिलाचा निकाल आपल्या बाजूने घेण्यासाठी 'क्लर्क' नावाने वकिलाने स्वीकारली २० हजार रुपयांची लाच
सोलापूर : सावकारी केसचे निकाल आपल्या बाजूने लावण्यासाठी व निकालपत्रासाठी सह निबंधक को ऑप सोसायटी पुणे येथील क्लार्क यांना ५० हजार रूपये द्यावे लागतील, असे सांगून तक्रारदार यांचे वकील दयानंद मल्लिकार्जू माळी यांना त्यांच्या अशिलाकडून २० हजार रुपयांची लाच स्विकारल्याप्रकरणी सोलापूर लाच लचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सोमवारी रंगेहात पकडले. या कारवाईनंतर न्यायालयीन वर्तुळात 'वकील, साहेब तुम्ही सुद्धा... ! अशी रसभरीत चर्चा सुरू आहे.
याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, यातील तक्रारदार महिलेविरूध्द सह निबंधक, को ऑप सोसायटी पुणे यांचे न्यायालयात सावकारी अपील केसची सुनावणी चालु आहे. या अपिलाचा निकाल आपल्या बाजूने लागावा, यासाठी पुणे कार्यालयातील क्लर्कला ५० हजार रुपये द्यावे लाच म्हणून लागतील, असे अॅडवोकेट दयानंद मल्लिकार्जुन माळी असे सांगितले होते. त्याचा पहिला हप्ता म्हणून ०५ हजार रुपये यापूर्वीच देण्यात आले होते.
उर्वरित रक्कम ४५ हजार रुपयांच्या मागणीनंतर त्या तक्रारदार महिलेने, सोलापूर येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली होती. त्या प्राप्त तक्रारीच्या अनुषंगाने, ०७ डिसेंबर रोजी पंचासमक्ष पडताळणी केली असता, खाजगी इसम वकील दयानंद मल्लिकार्जुन माळी यांनी तक्रारदार यांच्याकडे त्यांच्याविरुध्द सह निबंधक, को ऑप सोसायटी पुणे यांचे न्यायालयात प्रलंबित असलेल्या केसचा निकाल आपल्या बाजूने लागण्यासाठी व निकालपत्र प्राप्त करून घेण्यासाठी तेथील क्लार्क यांना ५० हजार रूपये द्यावे लागतील, असे सांगून त्यातील दुसरा हप्ता २० हजार रूपये स्वीकारताना सोमवारी रंगेहात ताब्यात घेण्यात आले. '
या प्रकरणी खाजगी इसम वकील दयानंद मल्लिकार्जुन माळी (रा. माळीवस्ती, सोरेगाव, विजापूर रोड, सोलापूर) यांच्या विरुध्द फौजदार चावडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही सुरू आहे.
याप्रकरणी पुणे येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस आयुक्त गणेश कुंभार आणि पथकातील पोलीस निरीक्षक चंद्रकांत कोळी, पोलीस अंमलदार पोअं/सोनवणे, पोअं/पकाले, पोअं/हाटखिळे, पोअं/किणगी, पोअं/सुरवसे (सर्व-नेमणूक लाप्रवि, सोलापूर) यांनी पार पाडली.