पंढरपूर : सध्या पंढरपुरमध्ये प्रदीप मिश्रा यांची शिवमहापुरण कथा सुरु आहे. यानिमित्ताने पंढरपुरमध्ये भाविकांची मोठी गर्दी झालेली आढळून येत आहे. सदर कथा श्रवणाच्या निमित्ताने अवघी विठ्ठलाची नगरी आता हरीहराच्या भक्तीत न्हाऊन निघालेली असतानाच चंद्रभागेतील अवैध वाळु उपशाचा प्रश्न येथील महर्षी वाल्मिकी संघ या सामाजिक संघटनेने ऐरणीवर आणला आहे. गुरूवारी, महर्षी वाल्मिकी संघाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी चंद्रभागेच्या वाळवंटात भली मोठी महादेवाची पिंड बनवून चंद्रभागेच्या पात्राचे रक्षण कर व प्रांताधिकारी व तहसिलदारांची बदली घडवून आण, यासाठी साकडं घातलंय.
चंद्रभागेच्या पात्रातील वाळू उपशाला जबाबदार असलेले व अर्थपूर्णरित्या अवैध वाळु उपशाला अभय देणारे पंढरपुरचे प्रांतधिकारी व तहसिलदार यांचे निलंबन करावे, अशी मागणी या संघटनेने गेल्या कित्येक दिवसांपासुन लावून धरलेली आहे. त्यादृष्टीने संघटनेकडून विविध आंदोलनं सातत्याने सुरुच आहेत. गुरूवारी, या संघटनेने चंद्रभागेच्या पैलतीरावरील म्हसोबा मंदिरानजीक चंद्रभागेच्या वाळवंटात वाळू उपशामुळे पडलेल्या मोठ्या खड्डय्यालगतच वाळूपासून भव्य अशी शिवशंभूची म्हणजेच महादेवाची पिंड बनवुन प्रांताधिकारी व तहसिलदार यांचे निलंबन करण्याची सद्बुध्दी शासनाला दे, आणि चंद्रभागेच्या वाळवंटाचं रक्षण करण्यासाठी आता तूच त्रिशूल हाती घेऊन उभा रहा अशी प्रार्थना महादेवाला केली.
सध्या पंढरीत शिवमहापुराण कथा सांगणारे प्रदीप मिश्रा महाराज यांनीही चंद्रभागेच्या वाळु उपशाचा प्रश्न गांभिर्याने घेऊन याबबत जनजागृती करावी अशी ईच्छा असल्याची माहिती यावेळी महर्षी वाल्मिकी संघाचे संस्थापक अध्यक्ष गणेश अंकुशराव यांनी एका प्रसिध्दीपत्रकाद्वारे दिली आहे.
चंद्रभागेच्या पात्रात पंढरपुरच्या तीरावर ज्याप्रमाणे वाळू उपसा होतोय त्याप्रमाणेच नदीच्या पैलतीरावर म्हसोबा मंदिराजवळ सुध्दा होतोय, शेगाव दुमाला गावाच्या हद्दीतून बेसुमार वाळु उपसा होत असून अनेक वाळु माफियांनी या ठिकाणी जेसीबीच्या व यारीच्या सहाय्याने वाळु उपसा करत मोठ-मोठे वाळुचे ढिगारे लावलेले आढळुन येतात. : ; हे आंधळ्याचं सोंग घेतलेल्या प्रांताधिकारी व तहसिलदारांना दिसत नाही का? वाळु माफियांना अर्थपुर्णरित्या अभय देऊन चंद्रभागेचं पात्र भकास करण्याचं खुप मोठं पातक हे दोन्ही अधिकारी करत असून आता प्रत्यक्ष श्रीहरी पांडुरंग व श्री महादेवंच यांच्या पापाचं फळ यांना देतील, असा आम्हास विश्वास आहे. त्यामुळेच आज वाळु माफियांनी उपसा केलेल्या वाळुपासूनच महादेवाची विशाल शिवपिंड बनवुन त्याचे पुजन करून साकडे घातले, अशी माहिती यावेळी अंकुशराव यांनी दिली.
यावेळी चंद्रकांत अभंगराव, गणेश तारापुरकर, अप्पा करकमकर, अनिल अधटराव, साहिल माने, हरी बळवंतराव, गणेश अभंगराव, पंकज अंकुशराव, कैलास कांबळे, संदीप कोरे, पांडुरंग नेहतराव, सचिन नेहतराव, नवनाथ परचंडे, भैया अभंगराव, ओंकार परचंडे, पाटील शिरसट, विठ्ठल अधटराव, भैया बळवंतराव, महेश परचंडे, भैया बेंबळे, सचिन नेहतराव, विनायक अभंगराव यांचेसह महर्षी वाल्मिकी संघाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.