सोलापूर : पोलीस खात्यात पुन्हा धमाका... ! सोलापुरात पोलीस कर्मचाऱ्यानं स्वतःवर गोळी झाडून स्वतःच्या जिंदगीला पूर्णविराम देण्याचा प्रयत्न केलाय. जिल्हा कारागृहात कर्तव्य बजावत असलेला विकास गंगाराम कोळपे असं त्या कर्मचाऱ्याचं नांव आहे. कोळपे यांनी वरिष्ठांच्या त्रासाला कंटाळून हे टोकाचं पाऊल उचलल्याची प्राथमिक माहिती पुढं आलीय. या घटनेने पोलीस प्रशासनात खळबळ माजलीय.
गेल्या ३ महिन्यातील पोलीस अधिकारी -कर्मचाऱ्यानं स्वतःच्या जीवनाला पूर्णविराम देण्याची ही तिसरी घटना आहे . शनिवारी रात्री विकास कोळपे या ३४ वर्षीय पोलीस कर्मचाऱ्यानं एसएलआर रायफलीने गोळी झाडली. त्यात कोळपे गंभीररित्या जखमी झाले. त्यांना तात्काळ शासकीय इस्पितळात दाखल करण्यात आलं, त्यांची प्रकृती गंभीर असल्यानं लगेच दुसऱ्या रूग्णालयात हलविण्यात आलंय.
विकास कोळपे यांच्या आत्महत्येच्या प्रयत्नामागं वरिष्ठांचा त्रास हेच कारण असल्याचे चर्चिलं जातंय. यापूर्वी पोलीस निरीक्षक माळाले यांनी ही वरिष्ठांच्या त्रासाला कंटाळून, कुटुंबाची माफी मागून आत्महत्या केली होती. त्यानंतर शिरसट आणि आता कोळपे यांनी तीच पध्दत अवलंबलीय. त्यांनाही कारागृह विभागातील वरिष्ठांचा त्रास होता, असे म्हटलं जातंय.