Type Here to Get Search Results !

गोटेवाडी येथे खा. जय सिद्धेश्वर स्वामी यांच्या हस्ते केंद्रीय योजनांच्या जनजागृतीपर चित्ररथाचे उद्घाटन


गोटेवाडी येथे खा. जय सिद्धेश्वर स्वामी यांच्या हस्ते 

केंद्रीय योजनांच्या जनजागृतीपर चित्ररथाचे उद्घाटन

सोलापूर : विकसित भारत संकल्प यात्रे अंतर्गत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देशभरातील अनेक जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील विविध केंद्रीय योजनांच्या लाभार्थ्याशी संवाद साधला.

सोलापूर जिल्ह्यातील या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण केंद्रीय योजनांच्या प्रचार व प्रसार करणाऱ्या मोबाईल व्हॅन द्वारे करण्यात आलेले होते. मोहोळ तालुक्यातील गोटेवाडी येथील कार्यक्रमाचे उद्घाटन खासदार जय सिद्धेश्वर स्वामी महाराज यांनी केले.

यावेळी माजी पालकमंत्री तथा आमदार विजयकुमार देशमुख, तहसीलदार मुळीक, गटविकास अधिकारी आनंद मिरगणे यांच्यासह गोटेवाडी चे ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.



प्रारंभी गोटेवाडी ता. मोहोळ येथे खासदार जयसिद्धेश्वर स्वामी महाराज यांच्या हस्ते केंद्रीय योजनांची माहिती देणाऱ्या चित्ररथाचे उद्घाटन फित कापून करण्यात आले. त्यानंतर दुपारी साडेबारा वाजता माननीय प्रधानमंत्री महोदय यात्रे अंतर्गत देशभरातील विविध लाभार्थ्यांची संवाद साधणार होते, या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण चित्ररथाच्या द्वारे गावोगावी करण्यात आलेले होते. गोटेवाडी येथील कार्यक्रमास खासदार जयसिद्धेश्वर स्वामी यांचीही उपस्थिती होती. तर गावातील शेकडो नागरिकांनी हे थेट प्रक्षेपण पाहिले तसेच केंद्रीय योजनांची माहिती जाणून घेतली.



दहिटणे येथील विकसित भारत संकल्प यात्रा कार्यक्रमास आमदार सचिन कल्याणशेट्टी यांची उपस्थिती होती. यावेळी दहिटणे येथील ग्रामस्थांना केंद्र शासनाच्या विविध योजनांची माहिती देऊन पात्र लाभार्थ्यांच्या नावांची नोंदणी करण्यात आली. तसेच सोलापूर महापालिकेच्या वतीने शहरातील सात रस्ता चौकात माननीय प्रधानमंत्री यांचा लाईव्ह कार्यक्रम लाभार्थ्यांना दाखवण्यात आला. यावेळी लाभार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मोहिमेचे योग्य नियोजन व लाभार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद-

शहर व ग्रामस्तरावर विविध योजनांची परिपूर्णता साधण्यासाठी या यात्रेच्या माध्यमातून जनजागृती करण्यात येणार आहे. ही मोहीम सोलापूर जिल्ह्यात 26 जानेवारी 2024 पर्यंत चालू राहणार आहे. यासाठी आठ वाहने केंद्र शासनाने परिपूर्ण उपलब्ध करून दिली आहेत. या मोहिमेचे यशस्वी आयोजन करण्यासाठी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हळे यांनी वेळोवेळी मीटिंग घेऊन मार्गदर्शन केलेले आहे. सोलापूर महापालिका हद्दीत महापालिका आयुक्त शितल तेली उगले यांच्या मार्गदर्शनाखाली मोहीम सुरू आहे. ग्रामीण व शहरी भागात लाभार्थ्यांकडून केंद्रीय योजनांचा लाभ घेण्यासाठी उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.

उद्देश-

" केंद्र शासनाच्या विविध योजनांसाठी पात्र असलेल्या परंतु अद्यापी लाभ न घेतलेल्या लाभार्थ्यापर्यंत ही योजना पोहोचण्यात येणार आहे. संभाव्य लाभार्थ्याची नोंदणी करणे नागरिकांशी वैयक्तिकचित्रफितीद्वारे संवाद साधून त्यांना योजनेबद्दल माहिती देणे व तेथेच प्रत्यक्ष लाभ मिळवून देणे या मोहिमेचा उद्देश आहे."

विकसित भारत संकल्प यात्रे अंतर्गत केंद्र शासनाच्या योजनांचा लाभ घेतलेल्या लाभार्थ्यांनी आपला अनुभव देखील व्हिडिओच्या माध्यमातून शेअर केले जात आहेत. जेणेकरून इतरांनाही त्यापासून प्रेरणा मिळत आहे.  तसेच नागरिकांना शासकीय योजनांची माहितीसाठी जिल्हा ते गाव गावपातळीवरती  चित्रकथाद्वारे जिंगलस, पोस्टर्स छायाचित्र, ध्वनी चित्रफीत आदी माध्यमातून प्रत्यक्ष प्रसिद्धी करण्यात येत आहे. जिल्ह्याच्या शहरी व ग्रामीण भागातील एकही लाभार्थी केंद्र शासनाच्या योजना पासून वंचित राहणार नाही यासाठी सर्व संबंधित यंत्रणांनी सूक्ष्मपणे नियोजन केले आहे. व गरजू लाभार्थ्यांना लाभ मिळवून दिला जात आहे.

केंद्र शासनाच्या योजना:-

केंद्र शासनाकडून राबविण्यात येत असलेल्या आयुष्मान भारत, पीएम गरीब कल्याण योजना,  दीनदयाल अंतोदय योजना, पंतप्रधान आवास योजना, पीएम उज्वला योजना, पीएम किसान सन्मान योजना,पोषण अभियान, जल जीवन मिशन,खेड्यात सुधारित तंत्रज्ञान सह मॅपिंग,  जनधन योजना, जीवन ज्योती विमा योजना, पीएम सुरक्षा विमा योजना , अटल पेन्शन योजना आदि.

२० हजार लाभार्थ्यांची उपस्थिती-

या संकल्प यात्रे अंतर्गत ग्रामीण भागातील 11 तालुक्यांपैकी सांगोला व उत्तर सोलापूर तालुक्यासाठी केंद्रीय योजनांची जनजागृती वाहन मिळालेले नाही. उर्वरित ०९ तालुक्यात आत्तापर्यंत २० हजार लाभार्थ्यांनी या कार्यक्रमास उपस्थिती लावलेली असून सुमारे १३ हजार ५० नागरिकांनी शपथ घेतलेली आहे. या ०९ तालुक्यात, २६ जानेवारी २०२४ पर्यंत या कार्यक्रमाची प्रचार प्रसिद्धी करण्यासाठी सूक्ष्म नियोजन करण्यात आलेले आहे.

जिल्ह्यात ०८ चित्र रथाद्वारे जनजागृती-

विकसित भारत संकल्प यात्रे अंतर्गत जिल्ह्याच्या ग्रामीण व शहरी भागातील नागरिकापर्यंत केंद्र शासनाच्या विविध योजनांची माहिती पोहोचवून योजनांचा प्रसार करण्यासाठी सोलापूर जिल्ह्यासाठी आठ चित्ररथ देण्यात आलेले असून याद्वारे जिल्ह्यातील ०१ हजार १९ ग्रामपंचायती व महानगरपालिका, नगरपरिषद, नगरपंचायतीच्या प्रत्येक वार्ड मध्ये चित्ररथ पोहोचून केंद्रीय योजनांची माहिती दिली जाणार आहे. प्रत्येक ग्रामपंचायत पोहोचण्यासाठी जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागामार्फत तालुका निहाय नियोजन करण्यात आलेले आहे, तर शहरी भागात चित्ररथ प्रत्येक वार्डापर्यंत पोहोचण्यासाठी जिल्हा नगरपालिका प्रशासन यांच्यामार्फत नियोजन करण्यात आलेले आहे.