२१०० कि.मी. च्या पंढरपूर ते घुमान रथ व सायकल यात्रेची पंढरीत सांगता
पंढरपूर : भागवत धर्माचे प्रचारक संत शिरोमणी श्री नामदेव महाराज यांची ७५३ वी जयंती, कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती श्री ज्ञानेश्वर माऊलींचा ७२७ वा संजीवन समाधी सोहळा व शिख धर्माचे संस्थापक गुरुनानक यांच्या ५५४ व्या जयंतीनिमित्त श्री क्षेत्र पंढरपूर ( महाराष्ट्र ) ते श्री क्षेत्र घुमान (पंजाब) अशा सुमारे २१०० किलोमीटरच्या रथ व सायकल यात्रेचा समारोप श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समितीचे अध्यक्ष ह. भ. प. गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्या हस्ते पंढरीतील श्री विठठल रुक्मिणी मंदिरात झाला. यात्रेचे हे दुसरे वर्ष होते.
संत शिरोमणी श्री नामदेव महाराज यांच्या श्री क्षेत्र पंढरपूर (महाराष्ट्र) या जन्मभूमी ते तिर्थक्षेत्र असलेल्या श्री क्षेत्र घुमान (पंजाब) या कर्मभूमीपर्यंत भागवत धर्म प्रसारक मंडळ, पालखी सोहळा पत्रकार संघ, श्री नामदेव दरबार कमिटी घुमान व देशभरातील विविध नामदेव शिंपी समाज संघटनांच्या वतीने शांती, समता व बंधूता या संत विचारांचा व संत साहित्याचा प्रचार व प्रसार करीत श्री क्षेत्र पंढरपूर ते श्री क्षेत्र घुमान अशी रथ व सायकल यात्रा काढण्यात आली होती. महाराष्ट्र, मध्यप्रदेश, उत्तरप्रदेश, दिल्ली, हरियाणा, पंजाब, राजस्थान व गुजरात या राज्याचा एक महिन्याचा दौरा करुन ही यात्रा शनिवारी, श्री क्षेत्र पंढरपूर मुक्कामी परतली.
पंढरपूर येथे संत नामदेव महाराज पादुकांची पूजा व अभिषेक माउली प्रतिष्ठानचे अध्यक्ष दिपकसिंह पाटणकर व त्यांच्या सुविद्य पत्नी यशश्रीदेवी पाटणकर या उभयतांच्या हस्ते करण्यात आली.
ही रथ व सायकल यात्रा शनिवारी, २३ डिसेंबर रोजी श्री क्षेत्र पंढरपूर येथे पोहोचली. या यात्रेच्या समारोपप्रसंगी श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समितीचे विश्वस्थ माऊली महाराज जळगांवकर, संभाजीराजे शिंदे, कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके, नामदेव महाराजांचे १७ वे वंशज ज्ञानेश्वर माऊली नामदास, भागवत धर्म प्रसारक मंडळाचे अध्यक्ष सूर्यकांत भिसे, श्रीधर सरनाईक यांच्यासह असंख्य वारकरी उपस्थित होते.