"आम्ही डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे दायाद आमच्या देशासाठी, भारतीय समाजासाठी, आणि सर्व प्राणिमात्राच्या हितासाठी ... वायुप्रदूषण, ध्वनी प्रदुषण, जलप्रदूषण, त्याच प्रमाणे विचार प्रदूषण करणारे कुठलेही कृत्य करणार नाही" क्षमस्व !
मी अनेक वर्ष चैत्यभूमी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या चैत्याला अभिवादन करण्यासाठी महामानवाच्या महानिर्वाण दिनी आलो.
आडमुठेपणा
चैत्यभूमीवर येताना शासनाने पुरवलेल्या वाहतूक यंत्रणेचा लाभ घेत असताना विनम्रता आणि कृतज्ञता व्यक्त केले गेली पाहिजे, या सर्व सुख सोईंचा उपयोग करताना सातत्याने सुज्ञपणे आचरण केले पाहिजे, सरकारी अधिकाऱ्यांना कर्मचाऱ्यांना, व सेवक वर्गाला सन्मानाने वागविले पाहिजे, त्यांच्या सूचना आणि मार्गदर्शनाचा आदर केला पाहिजे. विशेष करून पोलीस अधिकाऱ्यांना कर्मचाऱ्यांना सहकार्य करून आपला कार्यभाग साधला गेला पाहिजे. अरेरावी, टिंगल टवाळी करत चालणाऱ्या टोळक्यांना पुढाकार घेऊन मज्जाव केला पाहिजे. हा महामानवाला अभिवादन करण्यासाठी निवडलेला दिवस आहे, तो उत्सवासारखा समजता कामा नये, हा कृतज्ञता व्यक्त करण्याचा आदरांजली वाहण्याचा दिवस होय.
नाकर्तेपणा
चैत्यभूमीच्या परिसरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राहील, याची सर्वांनी दक्षता घेतली पाहिजे, पोलीस यंत्रणेला, वाहतूक यंत्रणेला, महानगर पालिका प्रशासन अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना सहकार्य करण्यासाठी पुढाकार घ्यावा, येथे नाकर्तेपणा करू नये. अभिवादन करण्यासाठी निवडलेला मार्ग अवलंबला जावा विनाकारण मध्ये घुसून दर्शनाचा लाभ होतो आणि पुण्य पदरी पडेल या भावनेपोटी लोकांच्या तासनतास रांगांचा अनादर करून नाकर्तेपणाचा कळस करू नका. भाषणबाजी करण्यासाठी राजकीय स्टेज उभारू नका, तर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा प्रचार व प्रसार करण्यासाठी असे देखावे सादर करण्यासाठी त्या जागेचा वापर करून सत्कार्य करा. सेवाभावी संस्था, वैद्यकीय संस्था, मोफत आरोग्य तपासणी केंद्र, मोफत अन्न पाणी पुरवठा करणाऱ्या अनेक प्रकारच्या सेवकांना सहकार्य करून आपला सकारात्मक प्रतिसाद देऊन सन्मानित करा. त्यांच्या विषयी अनास्था अनादर व्यक्त करून आपला नाकर्तेपणा सिद्ध होईल, असे वागू नका.
अनादरपणा
महामानवाच्या शिकवणीचा अनादर होईल, असे कृत्य करू नका, सेवा, सुरक्षा, सहकार्य, संयम आणि शांतता या तत्त्वांचा अनादर होईल, असे वर्तन करू नका, हा दिवस समता, स्वातंत्र्य, बंधुता आणि न्याय या मौलिक विचारांची पेरणी करणाऱ्या महामानवाच्या महानिर्वाण दिनाच्या साठी आयोजित केला जातो. त्याचा मी अनादर होऊ देणार नाही, अशा विचारांनी प्रेरित होऊन साजरा करण्याची प्रत्येकाने स्वेच्छेने प्रतिज्ञा करा. जगातील हे एकमेव चैत्य असे आहे की ज्या चैत्यावर लाखोंच्या संख्येने लोक अभिवादन करण्यासाठी येतात. म्हणूनच आदर्शवत कृत्य करून खरे खुरे भीम अनुयायी असल्याचे जगाला दाखवून द्या. ज्या महामानवाच्या महानिर्वाण दिनाच्या पूर्वसंध्येला महासागर शांत होतो, विनम्र होतो, आपल्या श्रद्धायुक्त लाटांच्या लडी हळुवार करतो, त्याचा एक प्रकारच्या अभिवादनाचा आदर्श घेऊया !
जयभीम !
जी. आर. गायकवाड,