Type Here to Get Search Results !

आगामी निवडणुकांत भटका-विमुक्त समाज महायुती सरकार व गद्दारांना धडा शिकवणार : हिरालाल राठोड



आगामी निवडणुकांत भटका-विमुक्त समाज महायुती सरकार व गद्दारांना धडा शिकवणार : हिरालाल राठोड

सोलापूर : शिंदे-फडणवीस सरकारने यापूर्वीचा फडणवीस पॅटर्न वापरुन शेतकरी आंदोलन, मराठा आंदोलन, ओबीसी आंदोलन उभे करुन वेळकाढूपणा करीत असल्याचं जनतेच्या लक्षात आले आहे. आमच्या पक्षामधून गद्दारी करुन सरकारमध्ये सामील झालेले अजित पवार व त्यांचे सहकाऱ्यांना आमचा भटका-विमुक्त समाज हा आगामी निवडणुकीत धडा शिकविल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा व्ही. जे. एन. टी. सेलचे प्रदेश अध्यक्ष हिरालाल राठोड यांनी गुरूवारी एका पत्रकार परिषदेत दिला.

राष्ट्रवादी काँग्रेस राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी विमुक्त-भटक्या समाजातील लोकांनी राज्यात सन्मानाने जगावे, त्यांचे भवितव्य उज्ज्वल व्हावे, या दुरदृष्टीने भटक्या-विमुक्त समाजाला समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी अनेक लोकहिताचे निर्णय घेतलेले होते. राज्यात भटक्या विमुक्त समाजाला वेगवेगळ्या प्रकारचे आरक्षण ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यामुळेच मिळाले असल्याने आमचा भटक्या विमुक्त समाजाने त्यांच्याच पाठीशी एकनिष्ठेने उभे राहून काम करण्याचा निश्चय केलेला असून मी गेल्या एक महिन्यापासून राज्याच्या प्रत्येक जिल्ह्याच्या दौऱ्यावर असून तेथील सामान्य जनतेची समस्या जाणून घेत आहे, असंही हिरालाल राठोड यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

केंद्रातील मोदी सरकार, राज्यातील महायुती आणि आमच्या पक्षातील अजित पवार यांच्या गद्दारीमुळे स्थापन झालेल्या सरकारचे पूर्णपणे दुर्लक्ष करुन आमच्या समाजाची संपूर्ण योजना केवळ कागदावरच असून कोणत्याही योजनेची अंमलबजावणी करीत नाहीत. सामान्य भटक्या विमुक्त जमातीच्या समाजास कोणताही लाभ मिळत नाही. त्यामुळे अनेक युवक, महिला, कष्टकरी गरीब लोक हे सर्वजण भटकंती करुन उपजिवीका करीत असलेल्या आमच्या भटक्या विमुक्त समाजाला सत्तेतील सरकारने उघड्यावर सोडलेले आहे, असा आरोपही प्रदेशाध्यक्ष राठोड यांनी यावेळी केला.

घरकुल योजना राबविली जात नाही, बेरोजगार युवकांसाठी वसंतराव नाईक महामंडळामध्ये थेट कर्ज योजना ही नावालाच आहे. या महामंडळामध्ये जाचक अटी घातल्याने कोणीही कर्ज घेऊ नये, रोजगार करु नये, असे सरकारचे उद्दिष्ट आहे असे दिसते.

केवळ राज्यातील जनतेची दिशाभूल करुन गेल्यावेळी पाच वर्षे मुख्यमंत्री पद भुषविलेले देवेंद्र फडवणीस सरकारने पाच वर्षामध्ये केवळ शेतकरी आंदोलन, मराठा आंदोलन उभे करुन केवळ लोकांचे लक्ष आंदोलनाकडे वेधून पूर्ण जनतेच्या मूलभुत प्रश्नांना बगल देण्यात यश मिळविल्याचा आरोपही राठोड यांनी केला. 

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय नेते शरद पवार यांच्या रुपाने भटक्या-विमुक्त समाजाचे चांगले काम झाले आहे, हे वास्तव आहे. त्यामुळे आमचा भटका-विमुक्त सर्व समाज त्यांच्या पाठीशी उभा राहणार आहे. राज्यात सर्वत्र सरकारविरोधी रोष दिसत आहे. येत्या  अर्थसंकल्पीय अधिवेशनाचेवेळी राज्य शासनाच्या विरोधात आम्ही मुंबई येथे एक लाखाच्यावर संख्येने लोक मोर्चाद्वारे आंदोलन करणार आहेत, आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीत या सरकारला धडा शिकवल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, असेही राठोड यांनी शेवटी सांगितले.

या पत्रकार परिषदेस व्ही.जे.एन.टी. सेलचे प्रदेश अध्यक्ष हिरालाल राठोड, सोलापूर शहराध्यक्ष महम्मद इंडीकर, प्रदेश कार्यकारिणी सदस्य संजय सरवदे, झोपडपट्टी सेल अध्यक्ष लक्ष्मण आबा भोसले, ज्येष्ठ नेते जे. एम. शिकलगार आदी प्रमुख उपस्थित होते.