हॉटेलचालकासह चार मद्यपींविरूद्ध गुन्हे दाखल
सोलापूर : राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने उत्तर सोलापूर तालुक्यातील सोरेगांव हॉटेल पूनम या ठिकाणी रविवारी टाकलेल्या धाडीत न्यायालयाने हॉटेलचालकासह चार मद्यपी ग्राहकांना एकूण ३७ हजार रुपयांचाचा दंड ठोठावला.
याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की रविवारी, ०३ डिसेंबर रोजी सायंकाळी साडे आठ वाजेच्या सुमारास राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या दुय्यम निरिक्षक उषाकिरण मिसाळ यांच्या पथकाने सोरेगाव कुमठे रोड सरकारी कॅनलच्या उजव्या बाजूस असलेल्या पूनम धाबा (पूर्वीचे नाव मूनलाईट) याठिकाणी छापा टाकला असता होटेल चालक गोविंद नेताजी दळवी (वय-३१ वर्षे) हा ग्राहकांना मद्य पिण्याची व्यवस्था उपलब्ध करुन देत असतांना आढळून आला.
त्याचेसह ४ मद्यपी ग्राहक सैंदप्पा निलप्पा कोंडवान, मोहम्मद इरफान उमरसाब बेन्नूर, शाहरुक रसूल शेख व सरफराज निसार शेख यांना अटक करण्यात आली. त्यांच्या ताब्यातून मॅकडॉवेल नंबर १ व्हिस्कीच्या १८० मिली क्षमतेच्या ३ बाटल्या, किंगफिशर स्ट्रॉंग बिअरच्या ६५० मिलीच्या २ बाटल्या व प्लास्टीकचे ग्लास असा एकूण १, २१० रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
गुन्ह्याचे दोषारोपपत्र सोमवारी प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी दारूबंदी न्यायालय श्रीमती नम्रता बिरादार यांचे न्यायालयात सादर केले असता, हॉटेल चालकास २५ हजार रुपये दंड व चारही मद्यपी ग्राहकांना प्रत्येकी ०३ हजार रुपये दंड असा एकूण ३७ हजारांचा दंड ठोठावण्यात आला.
ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक नितीन धार्मिक यांच्या मार्गदर्शनाखाली निरिक्षक राहूल बांगर, दुय्यम निरीक्षक उषाकिरण मिसाळ, कृष्णा सुळे, सहायक दुय्यम निरिक्षक अलीम शेख, जवान किरण खंदारे, शोएब बेगमपुरे, चेतन व्हनगुंटी यांच्या पथकाने पार पाडली.
आवाहन
ढाब्यांवर दारु विक्री करणे किंवा ग्राहकांना दारु पिण्याची व्यवस्था उपलब्ध करुन देणे तसेच त्याठिकाणी बसून दारु पिणे महाराष्ट्र दारुबंदी कायद्यान्वये गुन्हा आहे. याचे उल्लंघन करणाऱ्या धाब्यांची या विभागाकडून सातत्याने तपासणी सुरु आहे. याचे उल्लंघन करणाऱ्या ढाबा चालक व ग्राहकांविरुद्ध कडक कारवाई केली जाईल, असा इशारा राज्य उत्पादन शुल्क अधीक्षक नितीन धार्मिक यांनी दिला.