Type Here to Get Search Results !

०२ हॉटेलचालकांसह ०९ मद्यपींविरूद्ध गुन्हे दाखल; न्यायालयाने ठोठावला ५५ हजारांचा दंड



०२ हॉटेलचालकांसह ०९ मद्यपींविरूद्ध गुन्हे दाखल; न्यायालयाने ठोठावला ५५ हजारांचा दंड

सोलापूर : राज्य उत्पादन शुल्क, माळशिरस विभागाच्या पथकाने गुरुवारी मंगळवेढा शहरातील दोन धाब्यांवर टाकलेल्या धाडीत न्यायालयाने ०२ हॉटेल चालकासह ०९ मद्यपी ग्राहकांना ५४, ५०० रुपयांचा दंड ठोठावला. त्याचबरोबर मंगळवेढा-मरवडे रोडवर एका चार चाकी वाहनातून विदेशी दारुच्या वाहतुकीचा गुन्हाही दाखल करण्यात आला.

याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, गुरुवारी, १४ डिसेंबर रोजी रात्री राज्य उत्पादन शुल्क, माळशिरस विभागाच्या पथकाचे निरिक्षक संदिप कदम यांनी मंगळवेढा शहराच्या हद्दीतील हॉटेल जयभवानी या ढाब्यावर छापा टाकला. ढाबामालक कुमार सावंत हा ग्राहकांना मद्य पिण्याची व्यवस्था उपलब्ध करुन देत असतांना, आढळून आल्याने त्याचेसह ०५ मद्यपी ग्राहक समाधान किसन खवणकर, आप्पासो सिद्धेश्वर जाधव, सोमनाथ अशोक जाधव, आप्पा जायप्पा मोरे व सुनिल बाबूलाल वर्मा यांना अटक करण्यात आली.

 अन्य एका कारवाईत दुय्यम निरिक्षक सांगोला कैलास छत्रे यांच्या पथकाने मंगळवेढा शहराच्या हद्दीतील हॉटेल भैरवनाथ या ठिकाणी छापा टाकून होटेल मालक शुभम सुखदेव जोध, मद्यपी ग्राहक अनिल शेषेराव जाधव, दिपक हरी जाधव, दिपक रामा लोंढे व महेश अरविंद बोरकडे यांना अटक केली. 

दोन्ही गुन्ह्यातील तपास अधिकाऱ्यांनी एकाच दिवसात तपास पूर्ण करून आरोपपत्र न्यायालयात सादर केले असता, न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग, मंगळवेढा श्रीमती एस.एन. गंगवाल-शाह यांनी हॉटेल मालकांना प्रत्येकी २५ हजार रुपये दंड व मद्यपी ग्राहकांना प्रत्येकी ५,०० रुपये दंड अशी शिक्षा सुनावली. 

याच पथकाने शुक्रवारी दुपारच्या सुमारास मंगळावेढा-मरवडे रोडवर प्रशांत शंकर भगरे (वय २६ वर्षे, रा. भोसे ता. मंगळवेढा) हा त्याच्या मारुती व्हॅन क्र. MH13 DE 3438 मधून विदेशी दारुची वाहतूक करतांना आढळून आल्याने त्याला ताब्यात घेऊन त्याचेविरुद्ध महाराष्ट्र दारुबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. 

त्याच्या ताब्यातून विदेशी मद्याच्या 180 मिली क्षमतेच्या इंपेरियल ब्ल्यू व्हिस्कीच्या 48 बाटल्या, मॅकडॉवेल नंबर वन व्हिस्कीच्या 48 बाटल्या व रॉयल स्टॅग व्हिस्कीच्या 22 बाटल्या व वाहन असा, ०१, ४३, ८८४ रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. 

ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक नितीन धार्मिक यांच्या मार्गदर्शनाखाली उपअधीक्षक गुणाजी क्षीरसागर, निरिक्षक संदिप कदम, कैलास छत्रे, राजेंद्र वाकडे, सहायक दुय्यम निरिक्षक आवेज शेख, जवान गजानन जाधव, तानाजी काळे, तानाजी जाधव व वाहनचालक मारुती जडगे यांच्या पथकाने पार पाडली. 

आवाहन

नाताळ सण व नविन वर्षाच्या पार्श्वभूमीवर या विभागाकडून सहा पथके नेमण्यात आली असून परराज्यातील दारुच्या अवैध वाहतूकीवर करडी नजर ठेवण्यात येत आहे. तसेच ढाबा/हॉटेलच्या अचानकपणे तपासण्या करण्यात येत आहेत. ढाब्यावर दारु विक्री करणे तसेच त्याठिकाणी बसून दारु पिणे, कायद्याने गुन्हा आहे. कायद्याचे उल्लंघन करणाऱ्याविरुद्ध यापुढेही अशाच प्रकारे कडक कारवाया केल्या जातील. ज्या हॉटेल्सना न्यू ईअर पार्ट्यांचे आयोजन करावयाचे आहे, त्यांनी त्याठिकाणी मद्याचे वितरण करण्यासाठी या विभागाकडून रीतसर वनडे क्लब लायसंस घ्यावे, अन्यथा अशा हॉटेल्सचे मालक व आयोजकांविरुद्धही कारवाई करण्यात येईल. 

नितिन धार्मिक, अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क, सोलापूर