सोलापूर : सोलापूर ते अक्कलकोट जाणाऱ्या महामार्गावरील श्री लक्ष्मी मंदिर येथील चौकात वाढते अपघात रोखण्यासाठी त्या चौकात त्वरित गतिरोधक व सिग्नल लाईट बसवावे, अन्यथा गुरुवारी, २१ डिसेंबरपासून आमरण उपोषणाला बसणार असल्याचा इशारा महाराष्ट्र कामगार सेनेचे प्रदेशाध्यक्ष व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सोलापूर महानगर प्रमुख विष्णू कारमपुरी यांनी राष्ट्रीय महामार्ग प्रबंधक, सोलापूर विभाग यांना एका निवेदनाद्वारे दिला.
प्रधानमंत्री राष्ट्रीय महामार्ग योजनेअंतर्गत तयार झालेल्या सोलापूर ते अक्कलकोट महामार्गावर गांधीनगर-जुना अक्कलकोट नाकापासून सोलापूर व यशवंत सुतमिलपर्यंत उड्डाणपूल बांधण्यात आले, या उड्डाणपुलामुळे आणि सहा पदरी रस्त्यामुळे जड वाहतूक प्रवासी वाहतूक, एसटी बस , दुचाकी वाहने हे अति वेगाने शहरात वाहतूक करतात, यामध्ये ब्रिज संपल्या संपल्या सोलापूरच्या येणाऱ्या रस्त्याच्या उजव्या बाजूला कामगार व कारखानदार व लोकवस्ती आहेत व डाव्या बाजूला शाळा, कॉलेज सात ते आठ लोक वस्ती, विडी यंत्रमाग कारखाने अशा अनेक प्रकारची लोकवस्ती व संस्था आहे.
त्यामुळे वाहतूक व पादचाऱ्यांची मोठी रेलचेल आहे. हा रस्ता उद्घाटन झाल्यापासून असंख्य अपघात होऊन अनेक निष्पाप लोकांना जीव गमवावे लागले, याबाबत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष प्रणित महाराष्ट्र कामगार सेनेच्या वतीने जिल्हाधिकारी, राष्ट्रीय महामार्ग अधिकारी, परिवहन मंत्री, केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री, पोलीस आयुक्त, सोलापूर यांना निवेदन देण्यात आले, परंतु अपघात मुक्तीसाठी कुठलेही ठोस उपाय केला गेला नाही, म्हणून शिवसेना ठाकरे गट प्रणित महाराष्ट्र कामगार सेनेच्या वतीने अंतिम इशारा देण्यात येतो की, २० डिसेंबरच्या आत अपघात मुक्त योग्य उपाय होईपर्यंत गतिरोधक व सिग्नल लाईट बसवावे, अन्यथा २१ डिसेंबर रोजी सकाळी ११-३० वाजता आमरण उपोषण करण्याचा इशारा देण्यात आला आहे. या आंदोलनामुळे होणाऱ्या परिणामाची संपूर्ण जबाबदारी शासन व प्रशासन यांची राहील याची नोंद घ्यावी, असे पत्रकात नोंद केले आहे.
त्याचबरोबर या आमरण उपोषणाच्या आंदोलनात सर्व विडी कामगार, यंत्रमाग कामगार व असंघटित कामगार नागरिक बंधू भगिनी, विद्यार्थी, विद्यार्थिनी-पालक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन विष्णू कारमपुरी यांनी केले आहे.