अखिल भारतीय ग्रामीण साहित्य संमेलनात शेतकऱ्यांच्या विदारक स्थितीवर मंथन
सोलापूर : भगवान चौगुले (निमंत्रित प्रतिनिधी)
भारत हा कृषिप्रधान देश आहे. देशाची संस्कृती ही शेतकऱ्यांपासून सुरू होते. देश समृद्ध करण्यामध्ये शेतकऱ्यांचे योगदान मोठे आहे. साहित्य संस्कृती याचा पाया हा कृषी संस्कृती मधून सुरू झाला असून या वैभवशाली संस्कृतीचे जनक शेतकरी सध्या आपले जीवन विदारक स्थितीत जगत आहेत. प्रत्येकाचा शेतकरी राजा हा सध्या वेटबिगारीने गांजला आहे, हे अत्यंत चिंताजनक आहे. देशातील साहित्यिक व विचारवंत याला जबाबदार असल्याचे मत ज्येष्ठ साहित्यिक डॉ. श्रीपाल सबनीस यांनी व्यक्त केले.
अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद आयोजित १९ व्या अखिल भारतीय ग्रामीण मराठी साहित्य संमेलनाच्या उद्घाटन प्रसंगी डॉ. सबनीस हे बोलत होते. यावेळी साहित्य संमेलनाचे उद्घाटन शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष विठ्ठलराजे पवार यांच्यासह उपस्थित अन्य मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून करण्यात आली.
यावेळी व्यासपीठावर अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद गोरे, राष्ट्रीय खजिनदार फुलचंद नागटिळक, स्वागत अध्यक्ष सुहास पाटील - जामगावकर ,निमंत्रक अनिलकुमार अनुभुले, जिल्हाध्यक्ष प्रा. पंडितराव लोहोकरे, शहराध्यक्ष शाहीर रमेश खाडे, जिल्हा कार्याध्यक्ष रामप्रभू माने, ज्येष्ठ कवी देवेंद्र आवटी, कृषी तज्ञ शरदराव पाटील,ज्येष्ठ कवी माधव पवार आधी जण उपस्थित होते.
दुपारी १२ ते ०२ या सत्रांमध्ये कवी संमेलन संपन्न झाले. या कवी संमेलनासाठी ८३ ग्रामीण कवींनी सहभाग घेतला होता. या कवी संमेलनाच्या अध्यक्षपदी कवी देवेंद्र औटी हे होते. त्यानंतर परिसंवादाचे आयोजन ही करण्यात आले होते. प्रा. सुवर्णा गुंड यांच्या अध्यक्षतेखाली हा परिसंवाद पार पडला. सायंकाळच्या सत्रांमध्ये कवी, लेखक, साहित्यिक, फुलचंद नागटिळक यांनी नटसम्राट हे एकपात्री नाटक सादर केले. या नाट्यप्रयोगानंतर संमेलनाची सांगता झाली.
..... चौकट-१
शेतकऱ्यांना का भारतरत्न नाही ? : शरद गोरे
आज पर्यंत एकाही शेतकऱ्याला महाराष्ट्र भूषण महाराष्ट्र भूषण,भारतरत्न यासारख्या प्रतिष्ठित सन्मानाने सन्मानित करण्यात आले नाही. मग हा देश कृषीप्रधान कसा ? देशात ९७ टक्के कृषी संस्कृती असताना अभ्यासक्रमात मात्र तीन टक्के समावेश आहे, हे विदारक चित्र बदलणे गरजेचे आहे, असं प्रतिपादन अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद गोरे यांनी केले.
......चौकट-२
राज्यपालांनी शेतकरी व साहित्यिकांचा विचार करावा : श्रीपाल सबनीस
राज्यपाल नियुक्त आमदार कोट्यामध्ये साहित्यिक व कृषी क्षेत्रामधून प्रतिनिधी निवडताना साहित्यक शरद गोरे यांना संधी देण्यात यावी. राज्यपालांनी कॅंडिडेट निवडताना साहित्य आणि कृषी संस्कृतीला प्राधान्य देणे गरजेचे आहे, तरच साहित्यिक आणि शेतकऱ्यांना न्याय मिळेल. असे मतही श्रीपाल सबनीस यानी मांडले.
.....चौकट-३
...यांचा झाला सन्मान !
१९ व्या अखिल भारतीय ग्रामीण साहित्य संमेलनामध्ये काशिनाथ भतगुणकी यांना महात्मा बसवेश्वर समाजरत्न पुरस्कार, अनुजा प्रसाद मोहिते यांना सावित्रीबाई फुले समाज रत्न पुरस्कार, प्रा. राजश्री उत्तम रणदिवे यांना संगीत सूर्य केशवराव भोसले कलारत्न पुरस्कार, विठ्ठलवाडी येथील सहशिक्षिका सुप्रिया ताकभाते यांना शैक्षणिक क्षेत्रातील योगदानाबद्दल सावित्रीबाई फुले राज्यस्तरीय शिक्षकरत्न पुरस्कार, वडाचीवाडी येथील मार्तंड शेषराव जगताप यांना कृषी क्षेत्रातील योगदानाबद्दल पंजाबराव देशमुख जिल्हास्तरीय कृषीरत्न पुरस्कार, विठ्ठलवाडी येथील विठ्ठल सार्वजनिक वाचनालयाचे सचिव नेताजी पांडुरंग उबाळे यांना सामाजिक क्षेत्रातील योगदानाबद्दल महात्मा फुले राज्यस्तरीय समाज रत्न पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.तसेच दिव्यांग क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य त्याचबरोबर धाराशिव जिल्हा परिषद, समाजकल्याण विभागाचा आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाल्याबद्दल कवी भगवान चौगुले यांचा सत्कार करण्यात आला.
..........फोटो ओळी :
१९ व्या अखिल भारतीय ग्रामीण मराठी साहित्य संमेलनाचे दीप प्रज्वलन करून उद्घाटन करताना संमेलनाध्यक्ष श्रीपाल सबनीस, विठ्ठलराजे पवार, शरद गोरे, फुलचंद नागटिळक, सुहास पाटील-जामगावकर, प्रा. पंडितराव लोहकरे, शरदराव पाटील यांच्यासह अन्य मान्यवर छायाचित्रात दिसत आहेत.