Type Here to Get Search Results !

सोलापूर विद्यापीठात दोन दिवसीय अविष्कार संशोधन महोत्सव !


प्रथमच विद्यापीठ कॅम्पसमध्ये आयोजन; ४५० संशोधक विद्यार्थ्यांचा प्रकल्पासह सहभाग 

सोलापूर : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचा विद्यापीठस्तरीय अविष्कार संशोधन महोत्सव दि. ०३ व ०४जानेवारी २०२४रोजी विद्यापीठ कॅम्पसमध्ये आयोजित करण्यात आला आहे. यामध्ये विद्यापीठ संकुलातील व संलग्नित महाविद्यालयातील एकूण ४५० संशोधक विद्यार्थ्यांचा सहभाग असणार असून यावेळी त्यांनी आपल्या संशोधन प्रकल्पाचे सादरीकरण करणार असल्याची माहिती कुलगुरू प्रा. डॉ. प्रकाश महानवर यांनी दिली.


विद्यापीठ व संलग्नित सर्व महाविद्यालयांत महाविद्यालय स्तरावरील अविष्कार संशोधन महोत्सव पार पडले आहे.  ४५०विद्यार्थ्यांची विद्यापीठ स्तरावरील अविष्कार संशोधन महोत्सवासाठी निवड झालेली आहे. अविष्कार संशोधन महोत्सव महामहीम राज्यपाल तथा विद्यापीठाचे कुलपती यांच्या कार्यालयाकडून प्राप्त झालेल्या नियमानुसार आयोजित केला जात आहे. विद्यापीठ स्तरीयमधून राज्यस्तरीय अविष्कार संशोधन महोत्सवासाठी विद्यार्थ्यांची निवड केली जाणार आहे. यात पदवी, पदव्युत्तर पदवी व तसेच पीएचडीच्या विद्यार्थ्यांचा सहभाग आहे.

विद्यापीठ स्तरीय अविष्कार संशोधन महोत्सवाच्या आयोजनाच्या पूर्वतयारीसाठी कुलगुरू प्रा. डॉ. प्रकाश महानवर, प्र-कुलगुरू प्रा.डॉ. लक्ष्मीकांत दामा, कुलसचिव योगिनी घारे, राज्यपाल नियुक्त व्यवस्थापन परिषदेचे सदस्य प्रा. देवानंद चिलवंत तसेच नवोपक्रम नवसंशोधन सहचार्य मंडळाच्या संचालिका डॉ. अंजना लावंड आणि अविष्कार समन्वयक डॉ. विनायक धुळप, सह समन्वयक डॉ. अशोक शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली विविध समित्यांचे काम सुरू आहे.  

या संशोधन महोत्सवामध्ये सहा विभागांमध्ये विद्यार्थी सहभागी होऊ शकतात. यामध्ये ह्युमॅनिटीज लॅन्ग्वेजेस अँड फायनआर्ट, कॉमर्स अँड मॅनेजमेंट अँड लॉ, प्युअर सायन्सेस, एग्रीकल्चर अँड ऍनिमल हसबंडरी, इंजीनियरिंग अँड टेक्नॉलॉजी आणि मेडिसिन अँड फार्मसी या सहा विभागांचा समावेश आहे. प्रत्येक विभागातून गुणाानुक्रमे तीन विद्यार्थ्यांची निवड केली जाणार आहे. यातून निवड झालेले विद्यार्थी पुढे राज्यस्तरीय अविष्कार संशोधन महोत्सवात सहभागी होणार आहेत. राज्यस्तरीय संशोधन महोत्सव दि. १२ ते १५ जानेवारी २०२४ मध्ये महाराष्ट्र आरोग्य व विज्ञान विद्यापीठ, नाशिक येथे होणार आहे.