Type Here to Get Search Results !

चंद्रभागा आम्हा मातेसमान ... ! अवैध वाळू उपसा न थांबल्यास वारकर्‍यांसह करणार जनआंदोलन : गणेश अंकुशराव


चंद्रभागा आम्हा मातेसमान ... ! अवैध वाळू उपसा न थांबल्यास वारकर्‍यांसह करणार जनआंदोलन : गणेश अंकुशराव

पंढरपूर : गेल्या कित्येक वर्षांपासून चंद्रभागेतील होत असलेल्या वाळु उपशाविरोधात पंढरपुरातील महर्षी वाल्मिकी संघ ही सामाजिक संघटना आक्रमक झालीय, यावरुन नुकतीच या संघटनेने पंढरपुरचे प्रांताधिकारी व तहसिलदार यांना बडतर्फीची मागणीही केलीय. भागवत एकादशीच्या दिवशी या संघटनेच्या वतीने वारकरी भाविकांसह चंद्रभागेच्या पात्रातील वाळुमुळे पडलेल्या खड्ड्यात बसून आंदोलन करण्यात आले. 

यावेळी याच खड्डयात वारकरी भाविकांनी तसेच वासुदेवांनी किर्तन व भजन केलेे. चंद्रभागेतील अशाच खड्ड्यात पाण्याचा अंदाज न आल्यामुळे जीव गमावलेल्या अनेक वारकरी भाविकांच्या मृत्युच्या दुर्घटनांचाही उल्लेख करण्यात आला.

पंढरपुरातील चंद्रभागेच्या पात्रातील अवैध वाळू उपशा थांबवण्यास अपयशी ठरलेल्या पंढरपूरचे प्रांताधिकारी व तहसिलदारांच्या विरोधात महर्षी वाल्मिकी संघाकडून आंदोलनाची तीव्रता वाढते आहे, तसा चंद्रभागेतील वाळू उपसा थांबण्याऐवजी वाढत असल्याचे निदर्शनास येत आहे, त्यामुळे आम्ही लोकशाहीच्या मार्गाने आंदोलनाची धार वाढवणार असून चंद्रभागेच्या पात्रातील वाळुमुळे पडलेल्या खड्ड्यात वारकर्‍यांना सोबत घेऊन आम्ही कर्तव्यात कसुर करणार्‍या प्रांताधिकारी व तहलिदारांच्या विरोधात आंदोलन केले. 

हा वाळू उपसा थांबला नाही, तहसिलदार व प्रांताधिकार्‍यांची बडतर्फी झाली नाही, तर अवघ्या महाराष्ट्रातील वारकर्‍यांना सोबत घेऊन पंढरपुरात मोठे जनआंदोलन करु, असा इशारा यावेळी महर्षी वाल्मिकी संघाचे संस्थापक अध्यक्ष गणेश अंकूशराव यांनी दिला.

चंद्रभागा ही आमच्या मातेसमान आहे, परंतु गेल्या कित्येक वर्षांपासुन चंद्रभागेतून होणार्‍या भरमसाठ वाळू उपशामुळे चंद्रभागेचे पात्र भकास बनत चाललंय, दुषित पाण्यामुळे जलचर प्राण्यांसह वारकरी भाविकांच्या जीविताला धोका निर्माण झालाय. त्यामुळे हा खुप मोठा गंभीर प्रश्‍न असून हा प्रश्‍न सोडल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही, असा ठाम निर्धार केला आहे. 

यामध्ये आमचा कोणताही वैयक्तिक स्वार्थ नाही, परंतु हा अवैध वाळु उपसा थांबला पाहिजे. तो रोखण्यासाठी सपशेल अपयशी ठरलेल्या पंढरपुरच्या प्रांताधिकारी व तहसिलदार या जोडगोळीची बडतर्फी झाली पाहिजे, यासाठी आम्ही तळमळीने विविध आंदोलनं करत आहोत. आता तरी शासनाने याची दखल घेऊन सत्य परिस्थिती जाणून आमची मागणी मान्य करावी, अशी विनंतीही गणेश अंकुशराव यांनी यावेळी केली.

यावेळी महर्षी वाल्मिकी संघाचे कार्यकर्ते व वारकरी भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.