सोलापूर : प्रेमाच्या गोष्टीतून रंगवत गेलेली 'दास्तान-ए-इश्क' या कार्यक्रमातून कोल्हापूरच्या कलाकारांनी अॅम्फी थिएटरमध्ये जुन्या गाजलेल्या हिंदी गाण्यांची मैफिल चांगलीच रंगवली आणि त्याला सोलापूरकर रसिक श्रोत्यांनीही भरभरून दाद दिली.
महाराष्ट्र साहित्य परिषद, शाखा दक्षिण सोलापूर आयोजित तसेच इमॅजिनियस स्टुडिओ कोल्हापूर प्रस्तुत 'दास्तान-ए-इश्क' या कार्यक्रमाचं बुधवारी, २० डिसेंबर रोजी सायंकाळी अॅम्फी थिएटर मध्ये आयोजन करण्यात आले होते.
धीरे धीरे बोल कोई सुन ना ले, सोला बरस की बाली उमर को सलाम, जट यमला पगला दिवाना, वादा कर ले साजना, ये रात भिगी भिगी, दर्द ए दिल दर्द ए जिगर असे जुने एकापेक्षा एक बहारदार गाणे कोल्हापूरच्या इमॅजिनियस स्टुडिओच्या माध्यमातून शिरीष कुलकर्णी, रणजित बुगले, रविराज पोवार, राधिका ठाणेकर, नम्रता कामत या कलाकारांनी सादर करून हिंदी गाण्यांचा नजराणा पेश करीत या कार्यक्रमातून कोल्हापूरच्या गायकांनी सोलापूरकरांचे चांगलेच मनोरंजन केले.
प्रत्येक गाण्याला सोलापूरकरांनी टाळ्या आणि शिट्टया वाजवून चांगलीच दाद दिली. 'दास्तान-ए-इश्क' या गोष्ट प्रेमाची ही थिम घेऊन आयोजित केलेला हा कार्यक्रम रसिकांनी डोक्यावर घेतला. या कार्यक्रमाचे सुंदर निवेदन पराग ठाणेकर यांनी करीत रसिंकाची उत्कंठा वाढवत नेली.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा दक्षिण सोलापूरचे प्रमुख कार्यवाह जितेश कुलकर्णी यांनी केले. या कार्यक्रमाला प्रशांत बडवे, अमोल धाबळे, अभय जोशी यांच्यासह पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.