उजनी जलाशयात प्रतिबंधित 'या' मत्स्यपालनावर निर्बंध
सोलापूर : उजनी जलाशयात मासेमारी करणारे पूणे, सोलापूर व अहमदनगर जिल्हयातील दौंड, इंदापूर, माढा, करमाळा, कर्जत, श्रीगोंदा तालुक्यातील सर्व स्थानिक परवानाधारक मत्स्यव्यवसायीक/ विनपरवाना अनधिकृत मासेमारी करणारे सर्व सबंधीत सर्व सबंधित मत्स्यव्यवसायिक यांना कळविण्यात येते की, जिल्हाधिकारी पुणे यांच्या अध्यक्षतेखाली २८ नोव्हेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालय, पुणे येथे जलसंपदा विभाग, पोलीस विभाग, महसूल विभाग, मत्स्यव्यवसाय विभाग महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळ आणि स्थानिक मच्छीमार संघटना प्रतिनिधी यांचे समवेत संयुक्तपणे बैठक घेण्यात आली.
या बैठकी मध्ये जिल्हाधिकारी यांनी उजनी जलाशयात लहान मासळीच्या अनधिकृतपणे विनापरवाना मासेमारी करणाऱ्या संबंधीत मच्छीमारांवर तसेच जलाशयाच्या सभोवताली उजनी संपादीत क्षेत्रात प्रतिबंधित मांगुर मत्स्यपालनावर सर्व संबंधित विभागांनी संयुक्तपणे कारवाई करून गुन्हे दाखल करावेत अशा स्पष्ट सुचना देण्यात आलेल्या आहेत.
त्या अनुषंगाने उजनी जलाशयामध्ये लहान मासळी मासेमारी करणाऱ्या मत्स्यव्यवसायिक यांचेवर तसेच जलाशयालगत संपादित क्षेत्रात अनाधिकृतपणे विनापरवाना प्रतिबंधित मांगूर मत्स्यपालनावर जलसंपदाविभाग व इतर सर्व संबंधित विभाग यांचे कडून संयुक्तिक कारवाई करून गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत.
तरी सर्व संबंधित मत्स्य व्यावसायिकांनी याची गंभीरपणे दखल घेऊन उजनी जलाशयात लहान मासेमारी, मासळी करणे त्वरीत थांबवावे व सदर मासेमारी कामी उपयोगात येणारी जाळी व इतर साहित्य त्वरीत नष्ट करावेत. तसेच प्रतिबंधित मांगूर मत्स्यपालन करणाऱ्या मत्स्य व्यवसायिक यांनी त्यांच्याकडे उपलब्ध असणारा प्रतिबंधित मांगुर मासा त्वरित नष्ट करून उजनी संपादित क्षेत्रात असणारी शेततळी देखील नष्ट करण्यात यावीत, अन्यथा अशा प्रकारचा कोणताही गैरप्रकार उजनी संपादित क्षेत्रात आढळून आल्यास संबंधितावर विविध कलमाव्दारे कायदेशीर कारवाई करण्यात येईल, याची गंभीरपणे नोंद घ्यावी, अशाही सूचना करण्यात आल्या आहेत.
तसेच ज्या स्थानिक मत्स्य व्यवसाय करणारे मच्छिमार यांनी जनसंपदा विभागाकडून अधिकृतपणे उजनी जलाशयात मासेमारी करण्याचा परवाना घेतलेला नाही अशा सर्व स्थानिक मच्छिमार यांनी नजीकच्या जलसंपदा विभागाच्या शाखा कार्यालयाशी संपर्क साधून आवश्यक ते शासकीय शुल्क भरून त्वरीत परवाना प्राप्त करून घ्यावा. अन्यथा विनापरवाना जलाशयात प्रवेश केला म्हणून देखील कारवाई करण्यात येईल याची नोंद घ्यावी, अशी माहिती कार्यकारी अभियंता, उजनी धरण व्यवस्थापन विभाग,भीमानगर यांनी परिपत्रकाव्दारे दिली आहे.