Type Here to Get Search Results !

त्यांना' महायुतीचा भाग करणे, हे योग्य होणार नाही ! उपमुख्यमंत्री फडणवीस यांचं उपमुख्यमंत्री पवार यांना पत्र



'त्यांना' महायुतीचा भाग करणे, हे योग्य होणार नाही !

उपमुख्यमंत्री फडणवीस यांचं उपमुख्यमंत्री पवार यांना पत्र 


सोलापूर : सत्ता येते आणि जाते, पण सत्तेपेक्षा देश महत्वाचा आहे. सद्या विधानसभा सदस्य नवाब मलिक, केवळ वैद्यकीय आधारावर जामीन मिळाल्याने बाहेर आहेत. त्यांच्यावरील आरोप सिद्ध न झाल्यास आपण त्यांचे जरूर स्वागत करावे, मात्र अशा प्रकारचे आरोप असताना त्यांना महायुतीचा भाग करणे, हे योग्य होणार नाही, असे आमचे स्पष्ट मत आहे, असं राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी  उपमुख्यमंत्री अजित पवार यांना गुरूवारी, ०७ डिसेंबर रोजी पत्र लिहून कळवलंय.

राज्य विधीमंडळाचं हिवाळी अधिवेशन, नागपुरात सुरू आहे. माजी मंत्री आणि विधानसभा सदस्य नवाब मलिक हे आज विधिमंडळ परिसरात येऊन कामकाजात सहभागी झाले होते. विधानसभा सदस्य म्हणून त्यांचा तो अधिकार सुद्धा आहे. त्यांच्याबाबत आमची वैयक्तिक शत्रुता अथवा आकस अजिबात नाही, हे मी प्रारंभीच स्पष्ट करतो, असं सोशल मिडियावर व्हायरल झालेल्या पत्रात उपमुख्यमंत्र्यांनी म्हटल्याचं त्या पत्रात दिसतंय.

आपल्या पक्षात कोणाला घ्यायचे, हा सर्वस्वी आपला अधिकार आहे, हे मान्यच आहे. परंतू, त्यामुळे महायुतीला बाधा पोहोचणार नाही, याचा विचारही प्रत्येक घटक पक्षाला करावाच लागत असतो, त्यामुळे आमचा या गोष्टीला विरोध आहे, असंही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष अजित पवार यांना लिहिलेल्या म्हटलंय.

ज्या पद्धतीचे आरोप त्यांच्यावर आहेत, ते पाहता, त्यांना महायुतीमध्ये घेणे योग्य ठरणार नाही, असे आमचे मत आहे. त्यांना देशद्रोह्यांशी संबंध असल्याच्या आरोपाखाली अटक झाली तरी त्यांना मंत्रिपदावर कायम ठेवणाऱ्या तत्कालिन मुख्यमंत्री आणि महाविकास आघाडी सरकारच्या विचारांशी आम्ही सहमती दाखवू शकणार नाही, आपण आमच्या भावनांची नोंद घ्याल, अशी मला आशा असल्याचं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्या पत्रात म्हटलं आहे.