ध्वज दिन निधी २०२३ च्या उद्दिष्टापेक्षा दुप्पट निधी संकलन करण्यात येणार : अप्पर जिल्हाधिकारी तुषार ठोंबरे
सोलापूर : शासनाने सोलापूर जिल्ह्यास सन २०२२ मध्ये ०१ कोटी ५४ लाख ४१ हजाराचा सशस्त्र सेना दोस्ती निधी संकलनाचे उद्दिष्ट देण्यात आलेले होते. जिल्हा प्रशासनाने एकूण ०१ कोटी ८१ लाखापेक्षा अधिक म्हणजे उद्दिष्टाच्या ११७ टक्के निधी संकलन केले आहे. तरी देशाच्या सीमांचे अहोरात्र संरक्षण करणाऱ्या सैनिक व त्यांच्या कुटुंबीयांसाठी यावर्षी २०० टक्के निधी संकलन करू या असे आवाहन अप्पर जिल्हाधिकारी तथा प्र. जिल्हाधिकारी तुषार ठोंबरे यांनी केले.
जुने जिल्हाधिकारी कार्यालयातील बहुउद्देशीय सभागृहात आयोजित सशस्त्र सेना ध्वज दिन निधी २०२३ संकलनाचा शुभारंभ कार्यक्रमात अप्पर जिल्हाधिकारी ठोंबरे मार्गदर्शन करत होते. यावेळी जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी मिलिंद तुंगार, कमांडर अशोक कुमार, मेजर पाटील, राज्य उत्पादन शुल्क अधीक्षक नितीन धार्मिक, राज्य परिवहन चे कामगार अधिकारी चंद्रकांत घाटगे व अन्य अधिकारी तसेच विविध संस्था, शाळा/महाविद्यालय चे विद्यार्थी, ३८ बटालियन चे एन. सी. सी. कॅडेट, माजी सैनिक, वीर माता, वीरपत्नी उपस्थित होते.

अप्पर जिल्हाधिकारी ठोंबरे म्हणाले की, भारताचे परकीय आक्रमणापासून संरक्षण करण्यासाठी तसेच अंतर्गत शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी आपले शुर सैनिक स्वतःच्या परिवारापासून दूर राहून आपले कर्तव्य बजावत आहेत. देशाचे भवितव्य अबाधित राखण्यासाठी अनेक जवान शहीद झालेले आहेत. अशा शुर सैनिकाबद्दल कृतज्ञता व सदभावना व्यक्त करून त्यांचे ऋण अंशतः फेडणे तसेच पवित्र भावनेने सशस्त्र सेना ध्वजदिन निधी संकलित करून सैनिकांच्या कल्याणकारी योजना या निधीतून येतात. तरी सन २०२२ चा निधी ११७ टक्के संकलन करून चांगले काम केले आहे. तरी यावर्षी दिलेल्या उद्दिष्टांच्या २०० टक्के निधी संकलन करून सैनिकाप्रती सद्भावना व्यक्त करण्यात येणार आहे, असे त्यांनी सांगितले.

सशस्त्र सेना ध्वजदिन निधी भारतात दरवर्षी ०७ डिसेंबरमध्ये साजरा केला जातो. आर्मी, नेवी, वायुसेना हे तिघांचे हे प्रतिक आहे. जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, शाळा, महाविद्यालय, सामाजिक संस्था विविध संस्थांच्या मदतीने हा ध्वजदिन निधी जमा केला जातो. सन २०२२ करिता महाराष्ट्र शासनाकडून सोलापूर जिल्हयास १ कोटी ५४ लाख ४१ हजार इतके उद्दिष्टये देण्यात आले होते. सदर उद्दिष्टांपैकी सोलापूर जिल्हयाने १ कोटी ८१ लाख १२ हजार ८८८ इतका निधी संकलित करुन शासनाकडे वर्ग केला आहे, अशी माहिती जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी मिलिंद तुंगार यांनी दिली.
प्रारंभी दीपप्रज्वलन करुन कार्यक्रमाची सुरुवात झाली. जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी मेजर मिलिंद तुंगार यांच्या हस्ते प्रभारी जिल्हाधिकारी तुषार ठोंबरे व मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी वीर माता/वीर पत्नी यांचा प्रभारी जिल्हाधिकारी ठोंबरे यांच्या हस्ते साडी, श्रीफळ, गुलाबपुष्प देऊन सत्कार करण्यात आला. दहावीत चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झालेल्या माजी सैनिक यांच्या पाल्यांचाही धनादेश व प्रशस्तीपत्रक देऊन सन्मान करण्यात आला. त्यानंतर शहीद जवानांना श्रद्धांजली वाहण्यात आली.
सन २०२२ चे निधी संकलन उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी चांगले काम केलेल्या अधिकारी व विभागाचा गौरव करण्यात आला. कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली.