विजापूर रस्त्यावरील अपघात, वाहतूक कोंडी टाळण्यासाठी सर्व्हिस रोड ही काळाची गरज
'मंजूर काम त्वरित चालू करण्याची अॅड. मनीश गडदे यांची मागणी
सोलापूर : अत्यंत वर्दळीच्या व महत्त्वाचा अशी ख्याती असलेला सोलापूर-विजापूर राष्ट्रीय महामार्गाच्या दोन्ही बाजूस ०६ मिटर रुंदीचे सर्व्हिस रोड करणे, ही काळाची गरज व परिस्थितीची निकड झालीय. रोजचेच अपघात, वाहतूक कोंडी, बेशिस्त वाहतूक, टपऱ्यां-भाजी मार्केटचे अतिक्रमण, डिजिटल बोर्डांचा अडथळा या सर्व समस्यांचे कायमस्वरूपी निराकरण करण्याबरोबरच सामान्य जनतेला या जीवघेण्या प्रवासातून सुरक्षा देण्याकरता 'जुना विजापूर नाका ते सोरेगाव' जकात नाक्यापर्यंतच्या मंजूर सर्व्हिस रोडचे काम सोलापूर महानगरपालिकेने तात्काळ सुरू करावं, अशी मागणी अॅड. मनीश गडदे पाटील यांनी मनपा आयुक्तांकडे एका निवेदनाद्वारे केलीय.
या निवेदनात अॅड. मनीश गडदे-पाटील यांनी असं म्हटलंय की, सोलापूर ते विजापूर राष्ट्रीय महामार्ग हा सोलापूर शहराच्या मध्यवस्तीतून जात असल्याने जुना विजापूर नाका ते सोरेगाव जकात नाका (कि.मी. ३/२०० ते १०/००) या महामार्ग लगतच्या भागात प्रचंड वाहतूक कोंडी व अपघात प्रवण क्षेत्र निर्माण झालं आहे.
या भागातील नवनिर्मित नागरी वसाहती, बाजारपेठ व प्रचंड वाढलेली वाहनांची वर्दळ यामुळे रोजच छोटे-मोठे अपघात होत आहेत. वाहतूक कोंडी, रस्त्यावरील विक्रेते, उलट-सुलट वाहतूक इत्यादी तर नित्याच्याच समस्या झाल्या आहेत.
या महामार्गालगत रस्त्याच्या दोन्ही बाजूस महामार्गाची पूर्वीची संपादित जागा आज रोजी ही उपलब्ध आहे, परंतु भविष्यात अतिक्रमणाच्या प्रचंड वेगात ही नियोजित मंजूर सर्व्हिस रोडची रिकामी जागा गिळंकृत होण्याची दाट शक्यता आहे, अशी भितीही अॅड. गडदे-पाटील यांनी त्या निवेदनात व्यक्त केलीय.
वाढती लोकसंख्या आणि वाहने याचा पुढील २५ वर्षाचा (सन २०५० पर्यंत) विचार करता, आम्ही सातत्याने २०१५ पासून ०६ मीटरचा सर्व्हिस रोड होणेकरता प्रयत्नशील व आग्रही आहोत. यास सोमपाने अतिशय सकारात्मक प्रतिसाद देऊन नोव्हेंबर २०२२ मध्ये हा प्रस्ताव मंजूर केला आहे.
या सर्व्हीस रोडचा प्रश्न हा विजापूर रोड परिसरातील सुमारे ०२ ते ०३ लाख सोलापूरकरांच्या अत्यंत निकडीचा तसेच जीवन-मरणाच्या सुरक्षेचा यक्षप्रश्न झाला असल्याने, आयुक्तांनी सहानुभूतीपूर्वक या प्रश्नी लक्ष घालून सर्व्हिस रोडचे काम तात्काळ सुरु करण्याची कार्यवाही करावी, अशी मागणी अॅड. मनीश गडदे पाटील यांनी केली आहे.