Type Here to Get Search Results !

नशीब बलवत्तर ... ! कारच्या 'एअर बॅग' उघडल्याने सर्व प्रवासी सुखरूप

 

नशीब बलवत्तर ... ! कारच्या 'एअर बॅग' उघडल्याने सर्व प्रवासी सुखरूप

अचानक रस्त्यावर आलेल्या घोड्याला कारची धडक; घोडा जागीच ठार

सोलापूर : वाहतुकीचे नियम पाळण्यात सर्वांच हित असतं. त्यातच प्रवास करताना सीट बेल्ट लावणे किती हिताचा असतं, याचा प्रत्यय सोलापूर - तुळजापूर महामार्गावर दर्शन हॉटेलजवळ सायंकाळी घडलेल्या अपघातात दिसून आले. देवदर्शन आटोपून सोलापूरकडे निघालेल्या भाविकांच्या भरधाव कारच्या अचानक घोडा आडवा आल्याने कारची धडक लागून घोडा जागीच ठार झाला. नशीब बलवत्तर... ! कारमधील एअर बॅग उघडल्याने कारमधील प्रवाशाला कोणतीही दुखापत झाली नसल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. 

कोल्हापूर जिल्ह्यातील कसबा बावडा येथील रहिवासी प्रमोद पाटील, आपल्या कुटुंबासह एम एच ०९/ जी एफ ५७९६ या क्रेटा या वाहनातून तुळजापूर आणि अक्कलकोट दर्शनासाठी निघाले होते. ते शुक्रवारी महाराष्ट्राचे आदिशक्ती आई तुळजाभवानीचं दर्शन आटोपून सायंकाळी सव्वा चारच्या सुमारास तुळजापूर-सोलापूरमार्गे स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी अक्कलकोटकडे निघाले होते, दरम्यान हगलूर गावानजीक दर्शन ढाब्याजवळ एक घोडा अचानक रस्त्यावर आडवा आला, त्यातच गाडीला स्पीड असल्याने घोड्याला जोरदार धडक बसली. त्यात घोडा पन्नास फुटावर अधिक अंतरापर्यंत फरपटत गेल्याने गंभीर जखमी होऊन जागीच ठार झाला.


या अपघातात कारच्या समोरील इंजिनचा जणू चुराडा झाला, मात्र नशीब बलवत्तर... !  या दुर्घटनेत संकटाच्या क्षणी कारमधील समोरच्या एअर बॅग उघडल्याने कारचालक आणि पाटील कुटुंबीयांना सुदैवाने कोणतीही हानी झाली नाही. अपघातात मरण पावलेला घोडा कर्नाटक राज्यातील विजापूरजवळ राहणारी शेळ्या चारण्यासाठी फिरणाऱ्या शेळी मेंढी पालकांच्या टोळीमधील होता. त्यातील महिला त्यांचा पसारा घेऊन चालणाऱ्या घोड्यांना घेऊन आपल्या टोळीकडे निघाली होती. त्यावेळी एक घोडा अचानक रस्त्यावर आल्याने त्यास कारची धडक बसून त्याचा मृत्यू झाला. या अपघातानंतर सर्वजण भयभीत अवस्थेत असल्याचे दिसत होते.