'बंदी' ची मागणी हेच संविधान विरोधी; कोणत्याही आक्षेपावर पुराव्यानिशी चर्चेला तयार : सर्फराज अहमद
सोलापूर : गाजिओद्दीन रिसर्च सेंटर, च्या वतीने शुक्रवारी, ०८ डिसेंबर रोजी सायंकाळी ०६ वाजता डॉ. निर्मलकुमार फडकुले सभागृहात 'टिपू सुलतान यांच्या पत्रासार संग्रह' या अत्यंत महत्त्वाच्या व खरा इतिहास लोकांसमोर आणणाऱ्या पुस्तकाचं प्रकाशन राजू परुळेकर आणि डॉ. राम पुनीयानी यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे. दरम्यान भा.ज.यु.मो च्या पदाधिकाऱ्यांनी पोलीस उपायुक्तांकडे तक्रार देऊन या कार्यक्रमावर बंदी घालावी व भावना दुखावणाऱ्या कार्यक्रमाच्या आयोजकावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केलीय. त्यांची ही मागणी संविधान विरोधी आहे. त्यांच्या कोणत्याही आक्षेपावर पुराव्यानिशी चर्चेला तयार असल्याचं सर्फराज अहमद यांनी म्हटलंय.
या ग्रंथ प्रकाशन सोहळ्यात, प्रकाशनानंतर, 'भाजप प्रणीत टिपू सुलतान यांची बदनामी व वास्तव' या विषयावर डॉ.राम पुनीयानी हे बोलणार आहेत. त्याचबरोबर 'भाजपाच्या विद्वेषी राजकारणाचा सांस्कृतिक आधार व इतिहास' या विषयावर मा.राजू परुळेकर हे बोलणार आहेत. वास्तविक पाहता, हिंदू विरोधी म्हणून टिपू सुलतान यांची प्रतिमा सादर करीत मध्ययुगीन इतिहासाचे विद्रूपीकरण करून हिंदू- मुस्लिम राजकारण व समाजकारण दूषित करणाऱ्या लोकांना व साहित्यिकांना कागदपत्रासह सरफराज अहमद यांनी उत्तर दिलं आहे.
या कार्यक्रमावर बंदी घालावी, अशी मागणी करणाऱ्या भाजयुमोच्या कार्यकर्त्यांसोबत या विषयावर कागदपत्रासहित आम्ही जाहीर चर्चा करण्यास तयार आहोत, विचाराची लढाई विचारांनीच करावयाची असते. विचारशून्यता असेल तर लढाई मुद्द्यावर करण्याऐवजी हिंसेच्या माध्यमातून केली जाते. भारतीय संविधानाने आम्हाला विचार करण्याचे, लिहिण्याचे व बोलण्याचे स्वातंत्र्य दिले आहे. वास्तविक पाहता वैचारीक भूमिका मांडणाऱ्या कार्यक्रमांवर बंदी घाला, अशी मागणी करणे संविधानाच्या विरोधी असल्याचं त्यांनी म्हटलंय.
सोलापूर शहर-जिल्ह्यातील सर्व संविधान प्रेमी नागरिकांना व सर्व संघटनांना आवाहन करतो की, सदर कार्यक्रमात आपण उपस्थित राहून कार्यक्रम मोठ्या प्रमाणात यशस्वी करावा, असं आवाहन समविचार सभा, सोलापूरचे राम गायकवाड सर, काॅ. रविंद्र मोकाशी, विष्णू गायकवाड, उत्तमभैय्या नवघरे, बबलू गायकवाड, ॲड. गोविंद पाटिल, हसीब नदाफ, समीउल्लाह शेख, यशवंत फडतरे, जगन्नाथ हेमन, प्रविण चाफा कारंडे, शेखर बंगाळे, पोपट भोसले, हरिभाऊ नरखेडकर, सुरेश ननवरे, मोहित निकम, डॉ.ए.एम.शेख यांनी केलं आहे.