शेतकरी काय करू शकतो ? तो कांदा पिकावर ट्रॅक्टर ही फिरवू शकतो !
सोलापूर : शेतकरी काय करू शकतो ? या प्रश्नाचे उत्तर कधीच सापडत नाही. त्याचं उत्तर शोधायचे तर शेतकऱ्यांच्या कथेपेक्षा व्यथा जाणणं महत्त्वाचं असतं. घरचा कुटुंबकर्ता ' बाप ' माणूस त्याच्या व्यथा इतरांपुढं मांडू शकत नाही, तशीचं अवस्था कृषिप्रधान भारतातील शेतकऱ्यांची झालीय.
शेतकऱ्याच्या एखाद्या उत्पन्नाला पाच-दहा रुपयांना भाव वाढला तर कांद्याने रडवलं अशा बातम्या माध्यमातून झळकतात, मात्र तोच शेतकरी... आहे ती पुंजी खर्ची टाकून, एखादा हंगाम घाम गाळून रात्रीचा दिवस करून एखादं पीक वाढवतो, अन तो माल बाजारात घेऊन जाणं ही पडतळ खात नसेल, तर शेतकरी काय करू शकतो ? याचं त्याचं साधं सोपं उत्तर आहे, तो त्यावर ट्रॅक्टर ही फिरवू शकतो !
तो त्यावर ट्रॅक्टर फिरवू शकतो, हे वाक्य उच्चारायला सोपं असलं तरी प्रत्यक्षात अनुभवायचं म्हटलं तर अंगावर शहारे स्वाभाविक आहे. खरंतर कर्जात जन्मलेल्या सरळ व्याजात जगणाऱ्या अन् चक्रवाढ व्याजात मरणाऱ्या ' बळी ' राजाला समजून घ्यायचं असेल तर त्याच्या उत्पादित मालाला त्यानं केलेल्या कष्टाइतकं तरी मोल मिळावं या आशेवर तो जगतो. या आशेच्या पोटी जेव्हा निराशा जन्म घेते, तर अशावेळी शेतकरी उत्पादित खांद्यावर व अन्य कोणत्याही पिकावर ट्रॅक्टर फिरवल्यावाचून राहणार नाही.
हा कटू प्रसंग अनुभवलाय... उत्तर सोलापूर तालुक्यातील कोंडी चे शेतकरी दामोदर हरी निळ यांनी ! हल्ली मार्केटमध्ये कांदा पिकाची दुर्दशा पाहून त्याला मार्केटमध्ये आणणं सुद्धा परवडत नसल्याने दामोदर निळ यांनी त्यांच्या शेतातील शेतात वाळत टाकलेल्या कांद्यावर मोठा ट्रॅक्टर फिरवलाय. त्यात त्यांचं आर्थिक नुकसान किती झालंय हा भाग वेगळा असला तरी शेतकऱ्यांच्या उत्पादित मालाला माती एवढाही भाव नाही, हे दर्शविणारा विदारक व्हिडिओ शुक्रवारी, सोशल मीडियावर व्हायरल झालेला आहे.
निळ यांनी काढलेला थोडा कांदा मार्केटला नेला होता, परंतु बाजारात त्यास दोनशे,तीनशे आणि शंभर रुपये क्विटल गेला. या कटू अनुभवानंतर कृषी व्यवस्थेतील 'बाप' माणूस दामोदर हरी नीळ यांनी सर्व कांद्यावर ट्रॅक्टर फिरवून कांदा शेतातच गाडला. त्यामुळे शेतकरी काय करतो, एकच उत्तर आहे, ते म्हणजे कांदा पिकावर प्रसंगी ट्रॅक्टरही फिरू शकतो, हे मात्र नक्की !