नियमबाह्य पद्धतीने शिल्पनिदेशकाची सेवा समाप्ती; शासनाचे लक्ष वेधण्यासाठी बेमुदत उपोषण सुरू
सोलापूर : विजापूर रस्त्यावरील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील प्राचार्य ए. डी. जाधवर आणि उपप्राचार्य श्रीमती आर. जे. शेख यांनी संगनमतांना एका कर्मचाऱ्यास नियमबाह्य पद्धतीने कामावरून कमी करत त्याची सेवा खंडित केलीय. याप्रकरणी न्याय मिळण्यासाठी पाच महिने कागदी प्रपंच संपला तरी न्याय न मिळाल्याने शिल्पनिदेशक बसवराज मल्लिनाथ सारंगमठ यांनी शुक्रवारी, २२ डिसेंबर रोजी सकाळपासून जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर बेमुदत उपोषणास प्रारंभ केलाय.
शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत, जानेवारी २०१५ पासून तासिका तत्वावर कार्यरत असलेले बसवराज मल्लिनाथ सारंगमठ (रा. प्लॉट नं, ६०/२, राघवेंद्र नगर लाईन नंबर १३, मजरेवाडी, होटगी रोड, सोलापूर) यांना प्राचार्य जाधवर व उप प्राचार्य श्रीमती शेख यांनी संगनमताने, २३ जून २०२३ रोजी त्यांची सेवा समाप्त केली.
तसेच नवीन बॅच भरल्यानंतर शिल्प निदेशक रिक्त असताना संचालक व सहसंचालक यांच्या सूचनांना मुरड घालत, सारंगमठ यांची तासिका शिल्प निदेशक पदावरून सेवा खंडित केली. मात्र उभयतांनी गैर मार्गाचा अवलंब करून अपात्र उमेदवारांची नेमणूक केली, त्यांची ही कृती नियमबाह्य असून उभयतांच्या गैरकारभाराची कसून चौकशी करण्यात यावी, अशी मागणी उपोषणकर्ते बसवराज सारंगमठ यांनी केलीय.
प्राचार्य जाधवर आणि उपप्राचार्य श्रीमती शेख आणि निवड समितीने अपात्र उमेदवारांच्या केलेल्या निवडी रद्द करण्यात याव्यात आणि त्या ठिकाणी तासिका तत्त्वावर मला शिल्पनिदेशक म्हणून सेवेत घेण्याचे आदेश व्हावेत, अशी बसवराज सारंगमठ यांची एकमेव मागणी आहे.
याप्रकरणी बसवराज सारंग मोठे यांनी १२ डिसेंबर रोजी संचालक, व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचलनालय, मुंबई, सहसंचालक, पुणे आणि औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्यांना एक अर्ज देऊन त्यांची मागणी पुढे केली होती, त्यास कोणताही सकारात्मक प्रतिसाद न मिळाल्याने शुक्रवारपासून बसवराज सारंगमठ यांनी बेमुदत उपोषणास प्रारंभ केला आहे.