सोलापूर : राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पंढरपूरच्या पथकाने मागील ०२ दिवसात देशी दारुची वाहतुकीत गुंतलेली २ चार चाकी वाहने ताब्यात घेऊन दोन जणांविरुद्ध गुन्हा नोंदविला. उभयतांच्या ताब्यातून ०८.३० लाख रूपये किंमतीचा मुद्द्यामात जप्त करण्यात आला. सोलापूरच्या पथकाने शहरातील लोधी गल्ली येथील जय जगदंबा या हॉटेलवर सोमवारी टाकलेल्या धाडीत न्यायालयाने हॉटेलचालकासह ०४ मद्यपी ग्राहकांना ४१ हजार रुपयांचा दंड ठोठावला.
याबाबत मिळालेली अधिक माहिती की, निरिक्षक पंढरपूर किरण बिरादार यांनी त्यांच्या पथकासह रविवारी, ०३ डिसेंबर रोजी पंढरपूर तालुक्यातील तपकीरी शेटफळ येथे अब्दुल रहुफ हिरालाल (वय-२७ वर्षे) हा त्याच्या बोलेरो जीप (एमएच ४५/ एएल ८४१७) मधून देशी दारुची वाहतूक करतांना आढळून आल्याने त्याच्या ताब्यातून वाहन व दारु असा ०६.७० लाख रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत केला. अन्य एका कारवाईत या पथकाने सोमवारी मोहोळ तालुक्यातील आष्टी येथे सापळा रचून युवराज विष्णु पवार (वय - ४९ वर्षे) यास इसमास कार (एमएच १४/एफसी ०७८७) मधून देशी दारुची वाहतूक करतांना पकडले. या गुन्ह्यात त्याच्या ताब्यातून ०१.६० लाख रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
ही कारवाई निरिक्षक पंढरपूर किरण बिरादार, सहायक दुय्यम निरिक्षक जीवन मुंढे, जवान विजयकुमार शेळके व वाहनचालक रामचंद्र मदने यांनी पार पाडली. तसेच सोमवारी राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या दुय्यम निरिक्षक उषाकिरण मिसाळ यांच्या पथकाने सोलापूर शहरातील लोधी गल्ली येथील जय जगदंबा होटेलवर छापा टाकला असता, हॉटेल चालक संतोष शिवाजी कांगुणे (वय-४८ वर्षे) हा ग्राहकांना मद्य पिण्याची व्यवस्था उपलब्ध करुन देत असतांना आढळून आला. त्याच्या बरोबरच युवराज रामचंद्र पंतुवाले, धनराज बंसी मनसावाले, विश्वनाथ पंचप्पा हुग्गे व रफिक इब्राहिम मुल्ला या चौघा मद्यपिंना अटक करण्यात आली. गुन्ह्याचे दोषारोपपत्र मंगळवारी प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी दारूबंदी न्यायालय श्रीमती नम्रता बिरादार यांचे न्यायालयात सादर केले असता, हॉटेल चालकास २५ हजार रुपये दंड व चारही मद्यपी ग्राहकांना प्रत्येकी ०४ हजार रुपये दंड असा एकूण ४१ हजार रूपयांचा दंड ठोठावला.
ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक नितीन धार्मिक यांच्या मार्गदर्शनाखाली निरिक्षक राहूल बांगर, दुय्यम निरीक्षक उषाकिरण मिसाळ, कृष्णा सुळे, सहायक दुय्यम निरिक्षक अलीम शेख, जवान किरण खंदारे, शोएब बेगमपुरे, चेतन व्हनगुंटी यांच्या पथकाने पार पाडली.