पाचपट मावेजाची मागणी; चेन्नई-सुरत महामार्ग बाधितांचे आंदोलन
सोलापूर : कालबाह्य झालेला १९५६ चा कायदा बदलून, २०१३ चा भूसंपादन कायदा लागू करा व आमच्या जमिनी बाजारभावाच्या पाचपट रक्कम देऊन अधिग्रहित करा आदी मागण्या मांडत अक्कलकोट, बार्शी, दक्षिण सोलापूर व उत्तर सोलापूर तालुक्यातील चेन्नई- सुरत ग्रीनफिल्ड हायवेच्या बाधित शेतकऱ्यांनी सोलापूर येथे प्रशासनाविरोधात गुरुवारी एकदिवसीय लाक्षणिक उपोषण केले.
या आंदोलनात अक्कलकोट संघर्ष समितीचे अध्यक्ष बाळासाहेब मोरे, माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे, बार्शी संघर्ष समितीचे अध्यक्ष ओमप्रकाश पाटील, राजन क्षीरसागर, सुरेश हसापुरे, स्वामीनाथ हरवाळकर, रयत क्रांतीचे नामदेव पवार, नितीन ननवरे, प्रियांका दोड्याळे, अमोल वेदपाठक, रमेश भंगे, परमेश्वर गाढवे, विक्रम गाढवे, दिगंबर कांबळे, नागेश नाईकवाडी, मारुती आळवीकर, अर्जुन जमादार, विनीत पाटील यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.
१३ डिसेंबरला महामोर्चा
हिवाळी अधिवेशनाच्या काळात राज्यातील सुरू असलेल्या राष्ट्रीय महामार्गातील दहा हजारांहून अधिक बाधित शेतकरी अत्यल्प मोबदला व इतर विषय घेऊन १३ डिसेंबर रोजी एकत्रित येऊन नागपूर येथे महामोर्चा काढणार असल्याचे बाळासाहेब मोरे यांनी यावेळी बोलताना सांगितले.
शेतकऱ्यांच्या भावना शासनाला
कळवणार : जिल्हाधिकारी आशीर्वाद
अत्यल्प मोबदल्याविषयी याआधीच शासनाला कळवले आहे. जमीन सक्तीने ताब्यात घेण्याविषयी नोटिसा बजावले आहेत, हे वास्तव जरी असले तरी जिल्ह्यातील बाधित शेतकऱ्यांच्या भावना दिवसेंदिवस तीव्र होत असल्याचे शासनाला कळवणार आहे.
अधिवेशनात सरकार विरोधात एक होऊ : म्हेत्रे
केंद्र व राज्य सरकारकडून शेतकऱ्यांवर घोर अन्याय सुरू आहे. या विरोधात विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार व प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची अधिवेशनापूर्वी भेट घेणार असल्याचे सिद्धाराम म्हेत्रे यांनी स्पष्ट केले. येत्या हिवाळी अधिवेशनात याविषयी सरकारला 'सळो की पळो' करण्यासाठी विरोधी पक्षातील नेत्यांचे सहकार्य मिळवू, असंही माजी आमदार सिद्धाराम म्हेत्रे यांनी म्हटले.