सोलापूर : 'तुने मेरे रिश्तेदार को खल्लास किया है, अब मै तुझे जिंदा नही छोडुंगा, हा फिल्मी डॉयलॉग नव्हे तर वास्तवात घडलेल्या प्राणघातक हल्ला प्रसंगातील धमकीचे शब्द आहेत. या खूनी हल्ल्यात नबीलाल रजाक शेख (वय-२४ वर्षे) गंभीर जखमी झाला. ही घटना शेळगी परिसर, मित्रनगरात शुक्रवारी, १० नोव्हेंबरच्या रात्री साडे नऊ वा. च्या सुमारास घडलीय. जखमीस उपचारासाठी सर्वोपचार रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी, नबीलाल शेख (रा. बिशु मुजावर यांच्या वाड्यात भाड्याने, मित्र नगर) हा रवि एसटीडी बुथ जवळ बसलेला असताना, मोटार सायकलवर आलेल्या सद्दाम शेख याने ... अब मै तुझे जिंदा नही छोडुंगा, म्हणत त्याच्या पोटावर आणि डोक्यावर लोखंडी सुरीने वार केले. त्याचवेळी त्याचा दुसरा साथीदार सलमान होटगीकर याने बटनाच्या चाकूने नबीलालच्या पाठीवर केले.
या प्राणघातक हल्ल्यात दोघे शस्त्राने वार करीत असताना, त्यांच्या तिसऱ्या साथीदाराने लाथाबुक्याने मारहाण करुन शिवीगाळ केली. जखमी नबीलालला तात्काळ सर्वोपचार रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्याच्या फिर्यादीनुसार
सद्दाम शेख, सलमान होटगीकर आणि अन्य एका अनोळखी इसमाविरुध्द जोडभावी पेठ पोलीस ठाण्यात भादवि ३०७, ३२३, ५०४, ५०६, ३४ अन्वये शनिवारी सायंकाळी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सपोनि जाधव या गुन्ह्याचा अधिक तपास करीत आहेत.