Type Here to Get Search Results !

एकरुख उपसा सिंचन योजना कार्यान्वित करुन आवर्तन सुरू करावं; बुधवारपासून उपोषण

 


सोलापूर : एकरुख उपसा सिंचन योजना पूर्ण करुन दक्षिण सोलापूर तालुक्यातील २१ व अक्कलकोट तालुक्यातील ५१ गावातील पाणी तात्काळ कार्यान्वीत करुन आवर्तन सुरु न केल्याच्या निषेध व आवर्तन सुरू करण्याच्या मागणीसाठी बुधवारी,२९ नोव्हेंबर रोजी अक्कलकोट रस्त्यावरील कर्देहळ्ळी फाटा-कुंभारी येथे उपोषणास प्रारंभ करण्यात येणार असल्याची माहिती कृष्णात गणपत पवार यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली.


कृष्णात पवार यांनी पत्रकारांशी बोलताना, एकरुख उपसा सिंचन योजना कार्यान्वित होण्यासाठी वेळोवेळी निवेदन-आंदोलने झाली. दक्षिण सोलापूर तालुक्यातील जनतेच्या दृष्टीने जिव्हाळ्याचा प्रश्न असलेल्या पाणी प्रश्नावर शासन दरबारीही चर्चा झाली. २३ सप्टेंबर २०१९ रोजीच्या बैठकीचे इतिवृत्तांमध्ये नमूद केलेनुसार माहे मार्च २०२० अखेर योजना पूर्ण करणेबाबत विभागाला निर्देश दिले होते.

या योजनेची माहे मार्च २०२१ मध्ये चाचणीही घेण्यात आली होती. टेल टु एण्ड व समन्याई पाणी वाटप होत नसल्याने वेळोवेळी संबंधित पाटबंधारे खात्यास योजना कार्यान्वीत करुन आवर्तन सुरु करणेबाबत मागणी केली असता योजना चालू करणार अशी माहिती देण्यात आली, मात्र कृती शून्यात राहिली. त्यानंतर सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री व संबंधित विभागांना निवेदने देऊन आवर्तन सुरु करण्यासंबंधी पाठपुरावा करण्यात आला, मात्र आजअखेर आवर्तन सुरू न झाल्याने ते सुरू व्हावं, या मागणीसाठी तालुक्यातील २१ गावातील जनतेच्या वतीने बुधवारपासून उपोषण सुरू करण्यात येत आहे.

आमच्या मागणीचं निवेदन पीएमओ कार्यालय, नवी दिल्ली, मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य, उपमुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य, चंद्रकांत पाटील पालकमंत्री, सोलापूर, गृहमंत्री महाराष्ट्र राज्य, खासदार डॉ. जयसिध्देश्वर महास्वामी सोलापूर, आमदार सचिन कल्याणशेट्टी,अक्कलकोट,

आमदार सुभाष देशमुख, दक्षिण सोलापूर, जिल्हाधिकारी, सोलापूर, जिल्हा पोलिस अधीक्षक, सोलापूर ग्रामीण, अधिक्षक अभियंता, लाभक्षेत्र विकास प्राधिकरण, सोलापूर, अधिक्षक अभियंता, भिमा कालवा मंडळ, सोलापूर, कार्यकारी अभियंता, लघु पाटबंधारे विभाग क्र.८, सहाय्यक अभियंता, उजनी कालवा क्र.५७, पोलिस निरीक्षक, वळसंग पोलिस स्टेशन, वळसंग आणि पंचायत समिती, दक्षिण सोलापूर यांनाही पाठविण्यात आल्याचे कृष्णात पवार यांनी सांगितले.