सोलापूर : भारतीय राज्य घटना लोकार्पण होऊन ७५ वर्षे झाली. भारतीय संविधान हे डाॅ.बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीयांना दिलेली अमूल्य देणगी आहे. देशाची गंगा-जमुना संस्कृती व विविधतेत एकतेचे स्वरुप कायम ठेवण्यासाठी संविधानाचा आदर्श आपण सतत ठेवला पाहिजे.' असे विचार जमियत उलेमा-ए-हिंदचे मौलाना हरीस ईशाअती यांनी व्यक्त केले.
समविचार संस्थेतर्फे आयोजित संविधान दिनानिमित्त व डाॅ.आंबेडकर युथ असोसिएशनच्या करमाळा येथे जाणाऱ्या संविधान रॅलीला विजापूर वेस येथे निरोप देतांना ते बोलत होते. विजापूर वेस येथे उर्दू व मराठी भाषेमध्ये लिहीलेले संविधानाच्या प्रास्ताविकेचे मोठे बोर्ड लावण्यात आले होते. सुरुवातीला शाहीर रमेश खाडे यांनी आपल्या पहाडी आवाजात संविधान गीत सादर केले.
प्रास्ताविक करताना संजय जोगिपेटकर म्हणाले ' संविधानास कुणी हात लावायचा प्रयत्न केला तर आमचा प्राण गेला तरी चालेल पण जगात आदर्श असलेल्या भारतीय संविधानाचे रक्षण आम्ही करु.' राजा बागवान सर म्हणाले 'हजारो वर्षांपासूनची गंगा-जमुनी संस्कृती हे भारताचे वैशिष्ट्य आहे, अशा विविध रंगाने नटलेल्या संस्कृतीवर अलीकडे मोठे आघात होत आहेत, त्याचा आपण प्रतिकार केला पाहिजे. मराठा सेवा संघाचे राम गायकवाड सर यांनी आभार प्रदर्शन केले. सूत्रसंचालन हसीब नदाफ यांनी केले.विजापूर वेस येथील व्यवस्था मंजूर मामा बागवान व अशपाक बागवान यांनी केली होती.
पोलीस अधिकाऱ्यांच्या शाक्य सामाजिक संस्थेचे अध्यक्ष आनंद मुके, कैलास गायकवाड, अशोक भालेराव, बाळासाहेब सरवदे व इतर पदाधिकारी निळ्या-पांढऱ्या पोशाखात लक्ष वेधून घेत होते. आदित्य सुंचल यांनी संविधान जागर करणारं रॅप परफार्म केला. राष्ट्रीय एकात्मतेच्या घोषणांनी या रॅलीस निरोप देण्यात आला.
या कार्यक्रमास काॅ. रविंद्र मोकाशी, हाजी अय्यूब मंगलगिरी, हाफिज चाॅंदा, उत्तम भैय्या नवघरे, बबलू गायकवाड, ॲड.गोविंद पाटील, समीउल्लाह शेख, महीबूब कुमठे, शरीफ इंडिवाले, हारून हंजगीकर, विष्णू गायकवाड, नगरसेविका वाहीदा भंडाले, डाॅ. माधुरी पारपल्लीवार, प्रकाश गेंट्याल, ॲड. राजन दिक्षित, सुरेश ननवरे, यशवंत फडतरे, शेखर बंगाळे, प्रविण चाफाकारंडे, सुहेल शेख, व्ही. डी. बाबरे, ॲड. प्रशीक नवघरे, शफीक रचभरे, जाविद बद्दी, हाजी मुश्ताक ईनामदार, हाजी मुनाफ चौधरी, रियाज नाईकवाडी, मुज्जफर बागवान, सागर हेमन यांच्यासह असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.