Type Here to Get Search Results !

राज्य उत्पादन शुल्क विभागाने टाकलेल्या दोन छाप्यात ०२ वाहनांसह २६.३५ लाख रूपये किंमतीचा मुद्देमाल जप्त


सोलापूर : राज्य उत्पादन शुल्क विभागाने रविवारी माढा तालुक्यातील टेंभुर्णी व तांबवे परिसरात दोन ठिकाणी छापे टाकून देशी दारू व  गोवा राज्यातील विदेशी दारू व दोन चारचाकी वाहनांसह २६.३५ लाख रूपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला. या दोन्ही छाप्यात एका आरोपीस गजाआड करण्यात राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पोलिसांना यश आले असून एक आरोपी फरार झाला असल्याचे सांगण्यात आले.


या संदर्भात मिळालेली अधिक माहिती अशी की, राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाला मिळालेल्या खात्रीलायक बातमीनुसार त्यांनी 26 नोव्हेंबर रोजी माढा तालुक्यातील टेंभुर्णी- करमाळा बायपास पुलाच्या खाली पाळत ठेवून नंदू अजय मराठे (वय-३० वर्षे, रा.निमगाव (टे) ता. माढा) हा इसम त्याच्या महिंद्रा बोलेरो जीप क्रमांक एएच४५/एक्यू ४७५९ या वाहनातून देशी दारू व गोवा राज्यातील विदेशी दारू वाहतूक करीत असल्याचे आढळून आल्याने त्याच्याविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आले. 

या गुन्ह्यात आरोपीच्या ताब्यातून देशी दारूच्या विविध ब्रॅंडच्या १८० मिली क्षमतेच्या ६२४ बाटल्या व गोवा राज्य निर्मित व महाराष्ट्र राज्यात विक्रीस प्रतिबंध असलेला मॅक डॉवेल नंबर वन व्हिस्की १८० मिली क्षमतेच्या २८० बाटल्या, रॉयल स्टॅग १८० मिली क्षमतेच्या १७० बाटल्या व एड्रियल  क्लासिक व्हिस्की ७५० मिली च्या १३२ बाटल्या असा देशी-विदेशी दारूचा साठा व वाहन जप्त केले. या गुन्ह्यात भरारी पथकाने १०, ८८, ८०० रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला. आरोपीविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा नोंदविण्यात आला. त्यास सोमवारी माढा न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्यास ०२ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.



एक अन्य कारवाईत दुय्यम निरीक्षक, करमाळा विनायक जगताप यांनी निरीक्षक पंढरपूर यांच्या पथकासह तांबवे (मा. माढा) येथे अमोल वसंत खटके याच्या घराच्या पाठीमागील उसाच्या शेतामध्ये धाड टाकून त्या ठिकाणाहून दारू वाहतूक करण्यासाठी वापरण्यात येत असलेले महिंद्रा बोलेरो पिकअप वाहन क्रमांक एमएच ४५/ एएफ८५४८ व गोवा राज्य निर्मित विदेशी मद्याचा ०६. ९६, १२० रुपये किंमतीचा दारू साठा जप्त केला. या कारवाईत राज्य उत्पादन शुल्क विभागाने वाहनासह एकूण १५. ४६, १२० रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत केला. या गुन्ह्यातील प्रमुख आरोपी अमोल वसंत खटके हा फरार असून त्याचा शोध तपास अधिकारी विनायक जगताप करीत आहेत.

या दोन्ही कारवाईत राज्य उत्पादन शुल्क विभागाने आठ लाख पंच्यांशी हजार किंमतीची देशी-विदेशी दारू व दोन चार चाकी वाहन असा एकूण २६ लाख ३५ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. 

ही कारवाई अधीक्षक नितीन धार्मिक यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभारी निरीक्षक भरारी पथक सुरेश झगडे, निरीक्षक पंढरपूर किरण बिरादार, दुय्यम निरीक्षक शिवकुमार कांबळे, विनायक जगताप, सहायक दुय्यम निरीक्षक जीवन मुंढे, जवान अशोक माळी, नंदकुमार वेळापुरे, अण्णा कर्चे, अनिल पांढरे, विकास वडविले, विजयकुमार शेळके, प्रकाश सावंत व वाहन चालक दीपक वाघमारे व रामचंद्र मदने यांच्या पथकाने पार पडली.