सोलापूर : सोलापूर महानगरपालिका हद्दीत सार्वजनिक प्रसाधनगृहे(मुतारी) अनधिकृतरित्या पाडण्याचे बेकायदेशीर धंदे गेल्या अनेक वर्षापासून सोलापूर शहरात सुरू आहेत. महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांशी असलेली अभद्र युती त्यास प्रामुख्याने जबाबदार आहे. महानगरपालिकेकडे असलेल्या नोंदीनुसार ज्या ठिकाणाच्या मुताऱ्या पाडण्यात आल्या आहेत, त्या लँड माफिंयावर दंडात्मक कारवाई करण्यात यावी, या प्रमुख मागणीसह अन्य मागण्यांसाठी भीम रत्न बहुउद्देशीय सामाजिक संस्था, सोलापूर चे संस्थापक डी. डी. पांढरे यांनी भारतीय संविधान दिनी, आमरण उपोषण सुरू केलं, सोमवारी उपोषणाचा दुसरा दिवस होता.
सोलापूर शहरातील नागरिकांच्या सोयीसाठी प्रत्येक चौका-चौकातील कोपऱ्यावर पुरुषांसाठी प्रसाधनगृहे बांधली होती. त्याचवेळी महिलांची गरज विचारात घेऊन सात रस्ता परिसर सह अन्य ठिकाणी त्यांची ही नैसर्गिक विधी वा लघुशंखेची सोय करण्यात आली होती. त्याची बऱ्याच अंशी स्वच्छता ठेवली जात होती, मात्र अलीकडच्या काही वर्षातील चित्र वेगळेच दिसत आहे.
सोलापूर शहरातील अनेक महत्त्वाच्या ठिकाणच्या मुताऱ्या लँड माफीयांनी मनपातील विभागीय अधिकाऱ्यांशी हात मिळवणी करून मोठ्या संख्येने मुताऱ्या पाडलेल्या आहेत. आज अडचणीच्या क्षणी कोपरा शोधणारा सोलापूरकर इच्छा नसतानाही जिथे संधी मिळते तिथं लघु शंका करीत असलेल्याने सोलापूर शहराच्या स्वच्छ सोलापूरचे व्हिजन धुळीस मिळाले आहे.
सोलापूर शहरात 'स्मार्ट सोलापूर'साठी लाखो रुपये खर्चून ई टॉयलेट उभारण्यात आले होते, महानगरपालिकेच्या अनास्थेमुळे त्याची पुरी वाट लागली आहे, जणू टॉयलेट साठी खर्ची टाकलेले कोट्यावधी रुपये पाण्यात गेले आहेत. अशा वेळी सोलापूर शहरातील आजपर्यंत पाडण्यात आलेल्या तसेच उरल्या-सुरल्या मुताऱ्या पाडू पाहणाऱ्या बिल्डर्सचे व लँड माफीयांचे बांधकाम परवाने रद्द करण्यात यावेत, त्याचबरोबर मोठमोठ्या इमारती ही काळाची गरज असली तरी, त्यासाठी असलेले पार्किंगचे नियम दुर्लक्षित करण्यास महापालिकेचे अधिकारीच त्या लँड माफियांइतकेच जबाबदार असून त्यांच्यावर दंडात्मक कारवाई होत नाही तोपर्यंत हे आमरण उपोषण सुरू राहणार असल्याचे भीम रत्न चे संस्थापक अध्यक्ष डी डी पांढरे यांनी सांगितले.