सोलापूर : सोलापूर शहरातील ८८ खासगी जागेवर वसलेल्या झोपडपट्ट्यामधील राहत असलेल्या प्रत्येक झोपडीधारकास मूळ मालकाची अधिसूचित म्हणून राहत असलेली जागा विकत घेण्याकरिता सामाजिक न्याय व अर्थसहाय्य विभागामार्फत ०२ लाख रुपये अर्थसाहाय्य मिळावे, यासह अन्य पाच प्रमुख मागण्यांसाठी महाराष्ट्र प्रदेश झोपडपट्टी सुरक्षा दल, सोलापूरचे जिल्हा संघटक राजाभाऊ बेळ्ळेनवरु यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर आमरण उपोषण सुरू केले आहे. सोमवारी उपोषणाचा ०७ वा दिवस होता.
महाराष्ट्र प्रदेश झोपडपट्टी सुरक्षा दल, सोलापूर चे जिल्हा संघटक आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (अ) चे राजाभाऊ बेळ्ळेनवरु यांनी सोलापूर शहरातील झोपडपट्टी धारकांच्या समस्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी, २१ नोव्हेंबरपासून जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर अन्न-पाणी त्याग करून बेमुदत आमरण उपोषण सुरू केले आहे.
०९ मार्च २०१० रोजीच्या शासन निर्णयानुसार रमाई घरकुल योजनेचा लाभ मिळावा, अथवा पंडित दीनदयाल उपाध्याय घर जागा खरेदी अर्थसहाय्य ही योजना शहरातील राहत असलेल्या अधिसूचित खाजगी जागेवरील झोपडीधारकांना ग्रामीण प्रमाणे लागू करावी, तसेच दादासाहेब गायकवाड सबलीकरण योजनेअंतर्गत खाजगी मालकाची जागा सामाजिक न्याय विभागामार्फत विकत घेऊन अधिसूचित खाजगी जागेवरील झोपडीधारकांना ०७/१२ उतारा देऊन त्या ठिकाणी रमाई घरकुल योजनेचा लाभ द्यावा, यासह अन्य मागण्यासाठी आमरण उपोषण सुरू केले आहे.
सोलापूर शहरात सरकारी/ म.न.पा./ खाजगी जागेवर रमाई घरकुल योजना मंजूर झाल्यावर रमाई घरकुल बांधकाम करण्याकरिता शासनाकडून ०५ ब्रास वाळू मोफत मिळण्याची तरतूद असताना त्याची अंमलबजावणी होऊन लाभार्थ्यांना तात्काळ वाळू मिळावी आणि रमाई घरकुल योजना मंजूर झालेल्या लाभार्थ्यांना न्याय व विशेष सहाय्य विभाग यांच्यामार्फत दोन ब्लॅंकेट, एक कंदील देण्याचे शासन निर्णयाप्रमाणे तात्काळ वाटप करण्यात यावे, अशा मागण्या आहेत.
या मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत बेमुदत आमरण उपोषण सुरू राहील. उपोषण स्थळी काही अनुचित घडल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी प्रशासन आणि सरकार यांची राहील, असेही महाराष्ट्र प्रदेश झोपडपट्टी सुरक्षा दल, सोलापूर चे जिल्हा संघटक आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (अ) चे राजाभाऊ बेळ्ळेनवरु यांनी म्हटले आहे.