सोलापूर : राज्यात प्रतिबंधित असलेली सुगंधी तंबाखू आणि गुटखा विक्री करणाऱ्या पान शॉप वर छापे टाकून अन्न व औषध प्रशासनाने जवळपास ५० हजार रुपयांचा पान मसाला सुगंधित मसाला सुका मावा आणि गोवा गुटखा जप्त केला. अन्न व औषध प्रशासनाच्या पथकाने बार्शी रस्त्यावरील बाळे परिसरात लक्ष्मी पान शॉप व राजे पान शॉपसह अन्य ठिकाणच्या टाकलेल्या छाप्यात हा अवैध माल जप्त करण्यात आला असल्याचे पोलीस आयुक्तालय माहिती कक्षातून सांगण्यात आले.
महाराष्ट्र शासनाने राज्यात गुटखा विक्रीस बंदी घातलेली आहे. अशा स्थितीत पान शॉप चालक स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी जागोजागी गुटखा, सुका मावा, ओला मावा आणि प्रतिबंधित सुगंधी सुपारी विक्री करतात. अशा वेगवेगळ्या पान शॉपवर छापे टाकून सुमारे ५० हजार रुपयांचा अवैधमाल हस्तगत केला. याप्रकरणी अन्न व औषध प्रशासन कार्यालयातील रेणुका रमेश पाटील यांनी दाखल केलेल्या फिर्यादीनुसार फौजदार चावडी पोलिसांनी तिघाविरुद्ध गुन्हा दाखल केला.
शासनाच्या आदेशाची पायमल्ली करून प्रतिबंधित सुगंधी तंबाखू विक्रीस ठेवल्याप्रकरणी सुरेश धोंडीबा गिराम (रा. लोभा मास्तर चाळ, सोलापूर) विकी संजय गायकवाड आणि ज्ञानेश्वर लक्ष्मण निंबाळकर (रा. तिऱ्हे) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. सहाय्यक पोलीस निरीक्षक माने या गुन्ह्याचा अधिक तपास करीत आहेत.