सोलापूर : गुंतवणुकदारांचे आर. डी./दामदुप्पट पैसे करुन देण्याच्या आमिषाने कलकम रियल इन्फ्रा लि. कंपनीने ३६५ हून अधिक गुंतवणूकदारांची फसवणूक केल्याचा प्रकार उजेडात आला आहे. या कंपनीने गुंतवणूकदारांना वेगवेगळी आमिषे दाखवून सोलापूरकरांची जवळपास एक कोटी रुपयांहून अधिक रक्कम हडप केली असून याप्रकरणी त्या कंपनीचे मालक, सर्व पदाधिकाऱ्यांविरुद्ध फौजदार चावडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असल्याचे सांगण्यात आले.
कलकम रियल इन्फ्रा (इंडिया) लि. चे कार्यालय, दत्त चौकातील शुभराय टॉवर्स व कलकम रियल इंन्फ्रा (इंडिया) लि. या कंपनीची शाखा दत्त चौकातून व्ही. जी. एफ. ७१, द स्क्वेअर, बिझनेस सेंटर, मुरारजी पेठ, जुनी मिल कंपाऊंड, सोलापूर या ठिकाणी असून गुंतवणूकदारांना अमिषे दाखवून त्यांची १,००,३२,८५७ रुपयांची आर्थिक फसवणूक केली. हा प्रकार २०१२ पासून ते आजपर्यंतच्या दरम्यान घडला. या प्रकरणी :सौ. संगिता राजेंद्र सलगर (वय- ४० वर्षे, उमरगा, जि. उस्मानाबाद) फौजदार चावडी पोलीस ठाण्यात बुधवारी दुपारी फिर्याद दाखल केली.
त्यानुसार कलकम रियल इन्फ्रा लि. कंपनीचे मालक, सर्व पदाधिकारी, विष्णु दळवी, विजय सुपेकर, सुनिल रघुनाथ वांद्रे, अरविंद गोविंद वाघमारे, लक्ष्मण चंद्रकांत भोई, इ नेश्वर साठे व त्यांचे सहकारी यांच्याविरुद्ध एक कोटी रुपयांहून अधिक रक्कमेची फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला. सपोनि बनसवडे या गुन्ह्याचा अधिक तपास करीत आहेत.