सोलापूर : भारत महासत्ता होण्यासाठी मोफत शिक्षण, युवा वर्गास रोजगार, त्याचबरोबर सार्वजनिक वाहतूक व्यवस्था, सक्षम आरोग्य यंत्रणा आणि पायाभूत सेवा-सुविधांनी स्वयंपूर्ण बनणे आवश्यक असल्याचे मत नागपूरचे डॉ. युगल रायलु यांनी व्यक्त केले.
बुधवारी, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ आणि बँक ऑफ महाराष्ट्र एम्प्लॉईज युनियन औरंगाबाद यांच्या संयुक्त विद्यमाने कॉ. प्रभाकर यादव व्याख्यानमाले अंतर्गत नागपूरचे डॉ. रायलु यांनी अकरावे पुष्प गुंपले. 'भारताला महासत्ता बनवण्यात बँकांचे योगदान' हा त्यांच्या व्याख्यानाचा विषय होता. यावेळी अध्यक्षस्थानी कुलगुरू प्रा. डॉ. प्रकाश महानवर हे होते. याप्रसंगी कुलसचिव योगिनी घारे, बँक ऑफ महाराष्ट्र एम्प्लॉईज युनियनचे धनंजय कुलकर्णी यांची प्रमुख उपस्थिती होती.
डॉ. रायलु म्हणाले की, भारताला महासत्ता होण्यासाठी बँकांचे देखील योगदान महत्त्वाचे आहे. आर्थिक समृद्धता देखील महत्त्वाचे आहे. कृषी, निर्माण उद्योग आणि लघुउद्योग या तीन बाबी देशाला पुढे घेऊन जाण्यासाठी व महासत्ता बनण्यासाठी अतिशय महत्त्वाच्या आहेत. त्या बाबींवर काम करणे आवश्यक असल्याचे मतही त्यांनी यावेळी व्यक्त केले.
कुलगुरू प्रा. डॉ. महानवर म्हणाले की, भारत हा विस्तीर्ण आणि बहुसांस्कृतिक देश आहे. प्रत्येक ठिकाणी कुटुंब, गाव, राज्य आणि देश चालवण्यासाठी आर्थिक संपत्तीची गरज भासते. सामाजिक जडणघडण देशासाठी महत्त्वाचे असते. जीडीपीपेक्षा हंगर इंडेक्स हा महासत्तेसाठी महत्त्वाचा आहे. महासत्तेसाठी शिक्षणाचे योगदान खूप महत्त्वाचे आहे.
आपण शिक्षण क्षेत्रात काम करीत आहोत. भारताला महासत्ता बनवण्यासाठी प्रत्येकांचे योगदान देखील महत्त्वाचे असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. श्रुती देवळे यांनी केले.
फोटो ओळी
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, सोलापूर विद्यापीठात आयोजित व्याख्यानमालेचे दीपप्रज्वलन करून उद्घाटन करताना नागपूरचे डॉ. युगल रायलु. याप्रसंगी कुलगुरू प्रा. डॉ. प्रकाश महानवर, कुलसचिव योगिनी घारे व धनंजय कुलकर्णी छायाचित्र दिसत आहेत.