सोलापूर : मराठा समाजाला कुणबी आरक्षणबाबत विरोध करतो, असे म्हणत जिवे ठार मारण्याच्या उद्देशाने प्रताप शिवाजीराव कांचन (वय - ४५ वर्षे) यांच्या अंगावर केमिकलयुक्त काळे ऑईल टाकून शिवीगाळ करुन मारहाण केल्याप्रकरणी योगेश पवार यांच्यासह पाच जणांविरुद्ध फौजदार चावडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. हा प्रकार ३० ऑक्टोबर रोजी सायंकाळी ०४ वा. चे सुमारास, राघवेंद्र स्वामी मठाजवळ घडला.
यात हकिकत अशी की, सोलापूर-पुणे महामार्गावरील बाळे परिसरातील गणेश नगरात राहणारे प्रताप कांचन, मराठा समाजासंबंधी विविध काम करतात. त्यामुळे त्यांचे मराठा समाजाचे तसेच इतर समाजाचे नेते-कार्यकर्ते यांच्याशी परिचय आहे. गेल्या २० वर्षापासून प्रताप कांचन सामाजिक चळवळीत काम करीत आहेत.
गेल्या ६ मे रोजी तुळजापूरपासून मुंबईपर्यंत ३१ दिवस पायी चालत तसेच ९६ दिवस आझाद मैदान, मुंबई येथे मराठा समाजाला ५० टक्क्यातील ओ. बी. सी. मधूनच टिकणारे आरक्षण मिळावे, याकरीता कांचन आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी आंदोलन केले व करीत आहेत, आरक्षणाच्या प्रश्नी प्रामाणिकपणे सरकारकडे मागणी करीत आहेत, असं प्रताप कांचन याचे म्हणणे आहे.
३० ऑक्टोबर रोजी सायंकाळी राघवेंद्र स्वामी मठाजवळ योगेश पवार व त्यांच्या ४ सहकाऱ्यांनी केमीकलयुक्त काळे ऑईल घेऊन येऊन, फिर्यादीस मराठा समाजाला कुणबी आरक्षणबाबत विरोध करतो, असे म्हणत जिवे ठार मारण्याच्या उद्देशाने प्रताप कांचन यांच्या अंगावर केमिकलयुक्त काळे ऑईल टाकून शिवीगाळ करुन फिर्यादीस मारहाण केली.
त्या घटनेत, ते ऑईल प्रताप कांचन यांच्या डाव्या डोळ्यात व उजव्या कानात गेले. एकट्यावर अचानक इतक्या लोकांनी हल्ला करुन जिवे मारण्याचा प्रयत्न करुन त्यांच्या खिशातील ०५ हजार रुपये काढुन घेतले, तसेच अंगावरील कपडे फाडून त्याचा व्हिडीओ शुटींग करुन सोशल मिडीया, टि.व्ही. चॅनेल व वृत्तपत्र इत्यादीमध्ये पसरवून कांचन यांची बदनामी केली.
याप्रकरणी प्रताप कांचन यांनी फौजदार चावडी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. त्यानुसार योगेश पवार, राम जाधव, रतिकांत पाटील, ओंकार लोखंडे आणि किरण वाघमारे (सर्व रा. सोलापूर) या ०५ जणांविरुध्द भादंवि ३०७, १४३, १४७, १४९, ३२७, ४२७, ५००, ५०४, ५०६ अन्यये बुधवारी दुपारी गुन्हा दाखल करण्यात आला. दुपोनि देशमुख या गुन्ह्याचा अधिक तपास करीत आहेत.