सोलापूर : दक्षिण सोलापूर तालुक्यातील मुळेगांव येथे बुधवारी, १ नोव्हेंबर रोजी रात्री ८ वाजता मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळावे, तसेच मनोज जरांगे पाटील यांच्या आमरण उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी सकल मराठा समाज व इतर जाती-धर्माच्या समाजातर्फे चावडीपासून ते पूर्ण गावभर कॅन्डल मार्च काढण्यात आला.
यावेळी जरांगे पाटील तुम आगे बढो, हम तुम्हारे साथ है, एक मराठा, लाख मराठा, आरक्षण आमच्या हक्काचे नाही कुणाच्या बापाचं, अशाप्रकारच्या घोषणा देण्यात आल्या. मुळेगावात ग्रामस्थांकडुन राजकीय, सामाजिक, तसेच सर्व पक्षिय आमदार-खासदार, नेतेमंडळी यांना गावात प्रवेश करण्यास बंदी करण्यात आली आहे.
समस्त मराठा समाज मित्र नगर-शेळगीच्या वतीने पाठिंबा
समस्त मराठा समाज मित्र नगर शेळगी भवानी पेठ च्या वतीने आज मराठा समाजास ५० टक्के ओबीसी कोट्यातून आरक्षण व संघर्षनायक मजोज जरांगे-पाटील यांच्या समर्थनार्थ मार्केट यार्ड चौक, हैद्राबाद रोडवर बुधवारी टायर जाळून तेथील वाहतूक विस्कळीत करण्यात आली.
जोपर्यंत केंद्र सरकार व राज्य सरकार मराठा समाजास ओबीसी कोट्यातून ५० टक्के च्या आत टिकणारे आरक्षण देत नाही, तोपर्यंत हा लढा असाच सुरू राहील, ही तर सुरुवात आहे, आम्हा मराठ्यांच्या भावनेचा उद्रेक होऊ देऊ नका, तुमची संपूर्ण यंत्रणेला हे सर्व सोसणार नाही, असा इशारा देण्यात आला.