सोलापूर : खूनाच्या गुन्ह्यात जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेला शिक्षाधीन बंदी पॅरोलवर आल्यावर गेली १७ वर्षे स्वतःची ओळख लपवून वावरत होता. या कालावधीत त्याचा सोलापूर आणि लगतच्या उस्मानाबाद (आजचं धाराशिव) जिल्ह्यात वावरत होता, दरम्यान त्याने स्वतःचा विवाह ही उरकून घेतला. गेली १७ वर्ष पोलिसांच्या हाती न लागलेल्या शिक्षाधीन बंदीस पोलीस आयुक्तालयाच्या गुन्हे शाखेच्या कारवाईत अटक करण्यात आली. विकास हरी जाधव असं त्याचे नाव असल्याचे शहर पोलिसांनी सांगितले.
मोहोळ पोलीस ठाण्यात भा.दं.वि.सं.क. ३०२ अन्वये
२००० साली दाखल असलेल्या गुन्ह्यात विकास हरी जाधव (रा. शिवाजी नगर तांडा, केगांव) याला सोलापूर जिल्हा सत्र न्यायालयाने, ३१ जानेवारी २००२ रोजी जन्मठेपेची शिक्षा सुनावली. त्यास शिक्षाबंदी (बंदी क्र. सी- १६७४) म्हणून कोल्हापूर मध्यवर्ती कारागृहात ठेवण्यात आले होते. दरम्यान त्यास ०४ एप्रिल २००६ रोजी, अटी व शर्ती घालून, पॅरोल/अभिवचन रजेवर सोडण्यात आले होते.
विकास जाधव याला अभिवचन रजेवर सुटल्यानंतर, कोल्हापूर मध्यवर्ती कारागृह येथे, ०५ मे २००६ रोजी पुढील शिक्षा भोगण्यासाठी हजर होणे आवश्यक होते. मात्र, पुढील शिक्षा भोगावी लागू नये, या उद्देशाने तो जेलमध्ये हजर झाला नाही. त्यामुळे, विक्रम गणपत सोनवणे, (रक्षक) मध्यवर्ती कारागृह, कळंबा (जि. कोल्हापूर) यांनी, ०५ मार्च २०१४ रोजी, जेल फरारी शिक्षाधीन बंदी विकास जाधव याच्याविरूध्द फौजदार चावडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून, फौजदार पोलिसांनी येथे भादंवि २२४ प्रमाणे त्या बंदीविरूध्द गुन्हा दाखल झाला होता.
शिक्षाधीन बंदी विकास जाधव, जुना आरटीओ ऑफीस, गोदावरी लॉज समोर, सोलापूर येथे आला असल्याची गोपनीय बातमी सफौ. दिलीप किर्दक व पोकॉ भारत पाटील यांना मिळाली. त्यामुळे, सपोनि संदीप पाटील व त्यांचे तपास पथक आणि सफौ. दिलीप किर्दक व पोकॉ भारत पाटील यांनी नमूद शिक्षाधीन बंदी यास सोमवारी, ०६ नोव्हेंबर रोजी सायंकाळी सापळा लावून ताब्यात घेऊन चौकशी केली असता, त्याने त्याचे नांव विकास हरी जाधव (रा. शिवाजी नगर तांडा, केगांव, हल्ली मु.पो. गुंजेगांव (अकोले-मंद्रुप) असं असल्याचे सांगितलं.
तो कोल्हापूर मध्यवर्ती कारागृहातून अभिवचन रजेवर आला, नंतर पुन्हा शिक्षा भोगण्यासाठी कोल्हापूर मध्यवर्ती कारागृह येथे हजर झाला नसल्याचे सांगितले. त्यानंतर, त्यास फौजदार चावडी पोलीस ठाणे गुरनं ७९/२०१४ भादंवि - २२४ या गुन्ह्यात, तो पाहिजे आरोपी असल्याने, सपोनि संदीप पाटील यांनी, त्यास अटक करून पुढील कारवाई करिता फौजदार चावडी पोलीस ठाण्यात हजर केले.
ही कामगिरी पोलीस आयुक्त डॉ. राजेंद्र माने, पोलीस उप-आयुक्त (गुन्हे) डॉ. दीपाली काळे, सहाय्यक पोलीस आयुक्त (गुन्हे) श्रीमती प्रांजली सोनवणे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक (गुन्हे शाखा) सुनिल दोरगे यांच्या मार्गदर्शनाखाली स.पो.नि. संदिप पाटील, पोलीस अंमलदार दिलीप किर्दक, विजयकुमार वाळके, विद्यासागर मोहिते, तात्यासाहेब पाटील, गणेश शिंदे, भारत पाटील, सुभाष मुंढे आणि वसिम शेख यांनी पार पाडली.
.................. चौकट ..........
जेलमधून फरार झाल्यानंतर केलं लग्न !
शिक्षाधीन बंदी विकास जाधव जेलमधून फरार झाल्यानंतर त्याचा वेळोवेळी सोलापूर ग्रामीण व सोलापूर शहर पोलीसांनी वेगवेगळ्या ठिकाणी शोध घेतला, परंतु तो १७ वर्षात पोलिसांच्या हाती लागला नव्हता. तो पॅरोलवर सुटल्यानंतर त्याचं अस्तित्व/ओळख लपवून सोलापूर आणि उस्मानाबाद जिल्ह्यात वेगवेगळ्या ठिकाणी राहिला. विशेष म्हणजे, जेलमधून फरार झाल्यानंतर त्याने लग्न केल्याचंही निष्पन्न झाले आहे.