सोलापूर : अॅमेझॉन ऑनलाईन शॉपिंग केलेल्या ग्राहकांकडून खरेदीनंतर आलेली रक्कम कंपनीकडे जमा न करता, तो स्वतःकडे ठेऊन कंपनीची १३ लाख ८१ हजार रुपयांचा अपहार केल्याप्रकरणी फौजदार चावडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. सुजितकुमार अशोक बिराजदार (वय-३१ वर्षे) असं आरोपीचं नांव असल्याचे पोलीस आयुक्तालयाच्या माहिती कक्षातून सांगण्यात आलंय.
याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, अॅमेझॉन ऑनलाईन ग्राहकांनी शॉपिंग केलेला माल, सोलापूर-पुणे हायवे रोड लगत बाळे येथील डांगे प्लॉटमधील ऑफिसमध्ये येतो. तो पुढे सोलापूर शहरात त्या ऑनलाईन शॉपिग केलेले साहित्याचे वाटप करण्यासाठी सुपरवाईझर सुजितकुमार बिराजदार याच्या हाताखाली काम करणारे डिलीव्हरी बॉय हे ऑनलाईन शॉपिगचे वस्तू देऊन मिळालेले पैसे सुपरवाईझर बिराजदार याच्याकडे जमा करीत असत.
ती रक्कम ही कंपनीच्या खात्यावर जमा करायची असते, परंतु सुपरवाईझर बिराजदार यांनी तसे न करता ग्राहकांनी ऑनलाईन खरेदी केलेली १३,८०,९९० रूपयांची रक्कम कंपनीच्या बॅंक खात्यावर जमा न करता स्वत:जवळ ठेऊन कंपनीची फसवणूक केली. हा प्रकार ३१ ऑक्टोबर ते ०३ नोव्हेंबर दरम्यान घडला.
या प्रकरणी एरिया मॅनेजर ईश्वर नवनाथ शिंदे (रा. भुसेवस्ती, कासेगांव, ता. पंढरपूर) यांनी फौजदार चावडी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. त्यानुसार सुपरवाईझर सुजितकुमार बिराजदार (रा. सुलेरजवळगे, तालुका अक्कलकोट) याच्याविरुद्ध रविवारी सायंकाळी भादंविसं कलम ४०८ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलाय. सहाय्यक पोलीस निरीक्षक माने या गुन्ह्याचा अधिक तपास करीत आहेत.