जिल्हाधिकाऱ्यांचा ड्रायव्हर असल्याचे सांगून फसवणूक आरोपी गजाआड; ०४.२५ लाखाचा मुद्देमाल जप्त

shivrajya patra
सोलापूर : कलेक्टरच्या गाडीचा ड्रायव्हर असून, कलेक्टर साहेब हे मिटींगसाठी आलेल्या लोकांना सोन्याच्या अंगठ्या व लॉकेट गिफ्ट करणार आहेत, असे खोटे सांगुन, ६७.११ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने घेऊन अय्याज मुल्ला यांची फसवणूक केल्याच्या गुन्ह्यातील आरोपी शेख बाबु शेख छोटुमियाँ (वय-४० वर्ष) याला गजाआड करण्यात गुन्हे शाखेच्या पथकास यश आले. त्याच्या ताब्यातून ०४.२५ लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आल्याचे सोलापूर शहर पोलिसांनी सांगितले.

विजापूर रस्त्यावरील निहाल ज्वेलर्स मध्ये आलेल्या अनोळखी इसमाने अय्याज मकबुल मुल्ला यांना भेटून कलेक्टरच्या गाडीचा ड्रायव्हर असून, कलेक्टर साहेब हे मिटींगसाठी आलेल्या लोकांना सोन्याच्या अंगठ्या व लॉकेट गिफ्ट करणार आहेत, असे खोटे सांगुन, ०८ सोन्याच्या अंगठ्या व ०३ सोन्याचे लॉकेट असे सोन्याचे दागिने घेऊन अय्याज मुल्ला यांची फसवणूक केल्याचा प्रकार १७ ऑगस्ट रोजी ११.३५ वा. च्या सुमारास घडला. याप्रकरणी अय्याज मुल्ला यांच्या फिर्यादीनुसार विजापूर नाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

सदरचा गुन्हा उघडकीस आणून मुद्देमाल हस्तगत करणेबाबत पोलीस आयुक्त डॉ राजेंद्र माने, पोलीस उप-आयुक्त (गुन्हे) डॉ. दीपाली काळे, सहाय्यक पोलीस आयुक्त (गुन्हे) श्रीमती प्रांजली सोनावणे यांनी गुन्हे शाखेचे सर्व अधिकारी व पोलीस अंमलदार यांना मार्गदर्शन केले होते.

त्या अनुषंगाने सपोनि विजय पाटील, पोउपनि अल्फाज शेख व त्यांचे तपास पथकाने सी सी टी व्ही फुटेजची पडताळणी करुन आरोपीची ओळख पटविली. त्यानंतर आरोपी शेख बाबु शेख छोटुमियाँ (रा. रशीद टेकडी, नई आबादी, ता. भोकर जिल्हा नांदेड) यास बुलढाणा जिल्ह्यातील चिखली येथून ताब्यात घेऊन त्याचेकडे चौकशी केली. त्याने या गुन्ह्यातील फिर्यादीची फसवणूक केल्याचे कबूल करुन, गुन्ह्यातील फसवणूक झालेली संपूर्ण मालमत्ता ६७.११ ग्रॅम सोन्याचे दागिने , किंमत ४,२५,६२३ रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.

ही कामगिरी पोलीस आयुक्त डॉ. राजेंद्र माने, पोलीस उप आयुक्त (गुन्हे) डॉ. दीपाली काळे, सहाय्यक पोलीस आयुक्त (गुन्हे) श्रीमती प्रांजली सोनवणे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक (गुन्हे) सुनिल दोरगे, यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि विजय पाटील, पोसई अल्फाज शेख व पथकातील पोलीस अंमलदार राहुल तोगे, आबाजी सावळे, विठ्ठल यलमार, अजिंक्य माने, धिरज सातपुते, वसीम शेख, सिद्धराम देशमुख, अजय गुंड, चालक सतिश काटे व सायबर पोलीस ठाणेकडील अविनाश पाटील, प्रकाश गायकवाड, मच्छिंद्र राठोड यांनी पार पाडली.
To Top