सोलापूर : राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेचे जिल्हा सरचिटणीस राजाभाऊ सोनकांबळे यांना आधार बहुउद्देशीय सामाजिक विकास संस्था, सोलापूर यांच्या वतीने भारतीय संविधान दिनी रविवारी, २६ नोव्हेंबर रोजी आदर्श " राष्ट्रीय कामगार सेवा " पुरस्कार थोर ख्यातनाम लेखिका, माजी प्राचार्या श्रीमती नसीमा पठाण यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
भारतीय संविधान दिनी, येथील शिवस्मारक सभागृह आयोजित करण्यात आलेल्या पुरस्कार वितरण सोहळ्याला कॅनरा बँकेचे प्रादेशिक प्रबंधक रमेश कांबळे, थोर लेखिका, प्रा. नभा काकडे, सोलापूर पोलीस आयुक्तालयातील सहाय्यक पोलीस आयुक्त दिपाली काळे, फुले-शाहू-आंबेडकरी चळवळीमधील ज्येष्ठ लढवय्या नेते राजाभाऊ इंगळे आदींची प्रमुख अतिथी उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्रीमती नसीमा पठाण होत्या.
उपप्रादेशिक परिवहन कार्यालय सोलापूरचे वाहन निरीक्षक महेश रायभान, क्रीडा शिक्षक दशरथ गुरव, संभाजी आरमारचे अध्यक्ष श्रीकांत डांगे, युवा उद्योजक महादेव कोनगुरे, भारतीय बौद्ध महासभा, पुणे विभागीय संघटक शारदा गजभिये, सामाजिक कार्यकर्त्या सुवर्णा झाडे, मुख्याध्यापक बोधिप्रकाश गायकवाड, भाजपाचे राजाभाऊ माने आदींचाही त्या-त्या क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. शाल, पुष्पगुच्छ, बोधचिन्ह आणि प्रमाणपत्र असं पुरस्काराचे स्वरूप होते.
या पुरस्कार वितरण सोहळ्याला शैक्षणिक, कला-क्रीडा, नाट्य, कामगार क्षेत्र आणि राजकीय क्षेत्रातील ज्येष्ठ नेते -पदाधिकारी आणि कार्यकर्त्यां मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
..... चौकट .....
राजाभाऊ सोनकांबळे यांचं सामाजिक योगदान
सर्वत्र लढाऊ आणि लढवय्यांची संघटना असा अजरामर लौकिकप्राप्त भारतीय दलित पॅंथरपासून राजाभाऊ सोनकांबळे यांच्या सामाजिक कार्यास प्रारंभ झाला. ते रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या संघर्षमय सामाजिक आणि राजकीय जीवन प्रवासाबरोबर शासकीय तसेच निमशासकीय सेवेमध्ये कार्यरत असलेल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसह मागासवर्गीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या मूलभूत प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी मुंबई मंत्रालयापासून ते स्थानिक प्रशासकीय पातळीवर सामाजिक जाणीवेतून कर्तव्य निष्ठेने आणि प्रामाणिकपणे काम करीत आले.
कर्मचाऱ्यांना त्यांच्या मूलभूत हक्काचे न्याय मिळवून देणाऱ्या " रिपब्लिकन एम्प्लॉईजचे फेडरेशनचे जिल्हा प्रमुख, आरक्षण हक्क कृती समिती, सोलापूर जिल्ह्याचे समन्वयक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यान व संविधान भवन कृती समितीचे जिल्हा कार्याध्यक्ष म्हणूनही ते कार्यरत आहेत.