सोलापूर : सोलापूर शहरात मी यापूर्वी आले आहे.आज यशवंतराव चव्हाण सेंटर आणि सिग्निया यांच्या वतीने मोफत डिजीटल श्रवणयंत्र वितरण शिबीरात आलेल्या कर्णबधीरांच्या चेहऱ्यावर दिसणारा आनंद मोठा आहे.या श्रवणयंत्राच्या मदतीने त्यांना इतरांसारखं सामान्य जगता येईल,त्याचं सर्व श्रेय यशवंतराव चव्हाण सेंटर,सिग्निया कंपनी आणि हे शिबिर पूर्णत्वास घेऊन जाण्यासाठी प्रयत्नशील असलेल्या सर्वांच्या योगदानाचा यश आहे,असे प्रतिपादन कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या नामवंत गायिका अनुराधा पौडवाल यांनी केले.
यशवंतराव चव्हाण सेंटर आणि सिग्निया यांच्या संयुक्त विद्यमाने मंगळवारी,०७ नोव्हेंबर रोजी डॉ.निर्मलकुमार फडकुले सभागृहात मोफत डिजिटल श्रवणयंत्र वितरण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी प्रमुख अतिथी म्हणून सुप्रसिद्ध गायिका अनुराधा पौडवाल बोलत होत्या. या शिबिरात श्रवणदोष विद्यार्थी, आर्थिकदृष्ट्या दुर्बल वर्गातील १५० गरजूंना श्रवण यंत्रे वितरीत करण्याचे नियोजन होते,त्यापैकी ५ गरजूंना प्रातिनिधीक स्वरूपात त्यांच्या हस्ते श्रवण यंत्रांचं वाटप करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी यशवंतराव चव्हाण सेंटरचे ज्येष्ठ सदस्य दत्ता गायकवाड होते.
प्रारंभी, सर्व उपस्थित अतिथी आणि प्रमुख पाहुण्या सुप्रसिद्ध गायिका अनुराधा पौडवाल यांना यशवंतराव चव्हाण यांच्या जीवनावरील लिखित यांच्या जीवनावरील लिखित ग्रंथ देऊन सर्वांचे स्वागत करण्यात आले.याप्रसंगी सिग्निया कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश पवार,नॅशनल असोसिएशन ऑफ ब्लाईंडचे अध्यक्ष माजी आमदार प्रकाश यलगुलवार,श्री स्वामी समर्थ सहकारी सूत गिरणीचे चेअरमन राजशेखर शिवदारे,किशाला चक्रवर्ती, नवीन कुमार यांच्यासह अन्य मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.
यशवंतराव चव्हाण सेंटरच्या मुख्य कार्यकारी अधिकारी दीप्ती नाखले यांनी या कार्यक्रमाच्या आयोजनामागील भूमिका मांडताना, यशवंतराव चव्हाण सेंटरच्या माध्यमातून महिला,युवा,संस्कृती,आरोग्य,दिव्यांग व ज्येष्ठ नागरिकांसाठी संपूर्ण महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये आम्ही काम करीत आहोत,असं प्रास्ताविकात सांगून,यशवंतराव चव्हाण सेंटर राबवीत असलेल्या अनेक उपक्रमावर प्रकाश टाकला.
सद्यस्थितीला वाय.सी. सेंटरच्या माध्यमातून कृषी शिक्षण आणि संस्कृती क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करीत असलेल्यांना तसेच अनेक क्षेत्रात कार्यरत असणाऱ्यांना पुरस्कार देऊन सन्मानित करतो.वाय.सी.सेंटर आणि जागतिक स्तरावर श्रवण यंत्र निर्मिती आणि सेवा क्षेत्रातील सिग्निया कंपनी यांच्या माध्यमातून २०१८ पासून आजअखेर महाराष्ट्रातील श्रवणदोष असलेल्या ४० हजारांहून अधिकांना श्रवण यंत्राचे वाटप करण्यात आले असून, त्याचा १२ हजार ज्येष्ठ नागरिकांनाही लाभ झाला असल्याचे नाखले यांनी सांगितले.
कार्यकारी अध्यक्ष म्हणून खा.सुप्रिया सुळे वाय.सी.सेंटरचं कार्य पाहत असून त्यांच्या दूरदृष्टीकोनातून सुरू झालेल्या या उपक्रमाला श्रवण यंत्र निर्मिती क्षेत्रातील ब्रँड सिग्निया कंपनीचं एक मोठं सहकार्य लाभलंय. मोफत डिजिटल श्रवण यंत्र हे केवळ श्रवणातील दोष असलेल्यांना द्यायचे म्हणून दिलं जात नाही तर ते रचनात्मक पद्धतीने गरजूंपर्यंत पोहोचविले जाते.त्याच्या उपयोगातून त्यांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडवा,अशा पद्धतीने केले जाते,असे यशवंतराव चव्हाण सेंटर चे संयोजक विजय कान्हेकर म्हणाले.
या प्रसंगी बोलताना माजी आमदार प्रकाश यलगुलवार यांनी नेत्र शिबीरप्रसंगी यशवंतराव चव्हाणांनी उपस्थित राहून आशीर्वाद दिला होता.या उपक्रमाच्या माध्यमातून प्रेरणा मिळत असून सोलापूरकरांना यशवंतराव चव्हाण सेंटरने आम्हाला ऊर्जा द्यावी, असं म्हटले.
सिग्निया गुणवत्तेची श्रवणयंत्रे निर्माती कंपनी आहे.कंपनीचं मॅन्युफॅक्चरिंग लोकेशन युरोप,यु एस ए,एशिया असून आता त्यांनी भारतामध्ये सुद्धा मॅन्युफॅक्चरिंग करायला सुरुवात केलेली आहे,आम्ही भारतामध्ये सुद्धा भारतीयांची लाईफस्टाईल बघून त्यांच्यासाठी सूटेबल असे हेरिंगेट्स मॅन्युफॅक्चर करायला सुरुवात केलेली आहे असे सिग्निया कंपनीचे सीईओ अविनाश पवार यांनी सांगितले.
सुप्रियाताई मला अचानक एकदा दिल्ली एअरपोर्टवर भेटल्या त्यांनी मला यशवंतराव चव्हाण सेंटरच्या माध्यमातून जे उपक्रम राबविले जातात, त्याची माहिती दिली. हा मोठा प्लॅटफॉर्म आहे, तो आपल्याकडून मिस होऊ नये म्हणून मी त्यांना विनंती करून त्यात सहभागी झालो आणि आम्ही त्यांच्याबरोबर हा उपक्रम सुरू केला, आम्हाला खरोखर खूप अभिमान वाटतो.मी मूळचा सोलापूरचाच आहे,या शहरामध्ये मी लहानाचा मोठा झालो आणि इथे हा प्रोग्रॅम मला यशवंतराव चव्हाण सेंटर फाउंडेशनच्या बरोबर करायला मिळतोय.आम्ही असे प्रोग्राम संपूर्ण महाराष्ट्रभर यांच्याबरोबर करत राहू,त्यातून लोकांना लेटेस्ट टेक्नॉलॉजी मिळतील आणि या लहान मुलांचं लहानपण सुखकर होईल,त्यांना नॉर्मल शाळेमध्ये जाऊन शिक्षणाच्या संधी पण उपलब्ध करून देता येतील, असेही शेवटी अविनाश पवार यांनी सांगितले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन यशवंतराव चव्हाण सेंटरच्या दीपिका शेरखाने यांनी केले तर समन्वयक अभिजीत राऊत यांनी उपस्थितांचे आभार मानले.