सोलापूर : धाराशिव जिल्ह्यात दुष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण झाली असून जिल्ह्यात चारा छावणी सुरू करावी, प्रत्येक गावात टँकरने पिण्याचे पाणी उपलब्ध करून द्यावे आणि जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सरसकट कर्ज माफी द्यावी यासह अन्य मागण्यांचं निवेदन रयत क्रांती संघटनेच्या बैठकीत माजी मंत्री सदा खोत यांचेकडे कार्याध्यक्ष दीपक भोसले यांच्यामार्फत पाठवण्यात आले.
सोलापुरात गुरुवारी, रयत क्रांती संघटना (महाराष्ट्र राज्य) ची जिल्हा कार्यकारिणीची बैठक पार पडली. या बैठकीस राज्याचे कार्याध्यक्ष दीपक भोसले यांची प्रमुख अतिथी म्हणून उपस्थिती होती. याप्रसंगी रयत क्रांती संघटनेचे सोलापूर जिल्हाध्यक्ष नामदेव पवार, युवा अध्यक्ष अमोल वेदपाठक, राज्य सरचिटणीस हणमंत गिरी, जिल्हा कार्याध्यक्ष बाबा ननवरे , जिल्हाध्यक्ष महिला आघाडी सौ. तनुजा जावळे, कार्याध्यक्ष तनुजा मुळे, अक्कलकोट तालुकाध्यक्षा सौ. प्रियांका दोड्ड्याळे,धाराशिव जिल्हा युवक अध्यक्ष ॲड.यशवंत पाटील उपस्थित होते.
या बैठकीत सोलापूर आणि धाराशीव जिल्ह्यातील सामान्य नागरिक, श्रमकरी-कष्टकरी आणि शेतकऱ्यांच्या विविध समस्यावर मंथन झाले. सोलापूर जिल्ह्यातील दक्षिण सोलापूर, उत्तर सोलापूर, अक्कलकोट आणि मोहोळ तालुक्यातील दुष्काळी स्थितीवर रयत क्रांती चे जिल्हाध्यक्ष नामदेव पवार यांनी विचार मांडले.
या बैठकीत प्रमुख ०८ मागण्या अधोरेखित करण्यात आल्या. त्यात तातडीने नवीन कर्ज पुरवठा करावा, शालेय विद्यार्थी यांचे परीक्षा शुल्क माफी करावं, शेतकऱ्यांचं शेती वीज बिल माफ करून त्यांना सुरळीत वीज पुरवठा करावा या मागण्यांचा समावेश आहे. या मागण्यांचं निवेदन प्रदेश कार्याध्यक्ष दीपक भोसले यांच्याकडं सुपूर्द करण्यात आले.
यावेळी लक्ष्मण बिराजदार, रमेश भंगे, परमेश्वर गाढवे, नायकोडी, विक्रम गाढवे, तुळजापूर तालुकाध्यक्ष (युवक) सचिन हिंगमिरे, दिनकर जेवळे यांच्यासह सोलापूर व धाराशिव जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी-कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.