सोलापूर : ' लाथ मारीन, तिथं पाणी काढीन ' असं म्हणायचा प्रत्येकाचा एक उमेदीचा काळ असतो, मात्र आयुष्याला उतरण लागते, तेव्हा अनेकांना येणाऱ्या उद्याच्या प्रत्येक दिवसाच्या गरजांशी लढत असताना, प्रसंगी हतबलही होतो, मात्र अशा निकराच्या प्रसंगीही हात पसरण्याची वृत्ती नसलेला लढाऊ बाणा जगण्याच्या रणमैदानात आहे, त्या साधनांवर आपला संघर्ष चालूच ठेवतो. अशा वेळी त्याचा आधारच गेला, तर... तर तो हतबल होतो.
जुळे सोलापूरकडे विकसित नागरी वस्तीचा परिसर म्हणून पाहिलं जातं. या परिसराला लागूनच कल्याणनगर असून तिथं एक निराधार वृद्ध जोडपे राहतं. ज्यांनी आपल्या मुलांना उच्च शिक्षण दिलं. त्यांच्यासाठी घर-दारही विकलं. आपलं घर-दार, गावही सोडलं. त्याच मुलांच्या दोन हाताचे चार हात झाले अन् मुलांनी त्या आई-वडिलांना वाऱ्यावर सोडून निघून गेले.
आयुष्याचा सुर्य मावळतीकडं कलत असताना, आपल्या सहचरणीला घेऊन कल्याण नगरमध्ये ते राहतात. एम. एस. ई. बी. मध्ये सेवा करून 'रिटायर्ड' म्हणून केवळ १, २०० रुपये पेन्शन मिळते. त्यामध्ये दोघांचा घर-प्रपंच भागवताना नाकी नऊ येतात. ते टाळण्यासाठी घरचा कर्ता, वयाच्या पंच्याहत्तरीतही जणू ' अजूनी तारूण्यात मी ' म्हणत आपलं व आपल्या सहचरणीच्या पोटचं खळगं भरण्यासाठी ते एमआयडीसी भागातील वीर तपस्वी मंदिराजवळ सायकलवर कामाला जाऊन आपली उपजीविका भागवत आहेत.
अशा संघर्ष योध्द्याला मानाचा मुजरा ! पण दोन-तीन दिवसांपूर्वी दुर्दैव आड आलं अन् त्यांची सर्वात मोठा आधार असलेली सायकल चोरट्यांनी रात्रीच्या वेळी घराजवळून चोरून नेली. त्यामुळे कामावर जायचं कसे ? हा मोठा प्रश्न त्यांच्यासमोर निर्माण झाला. वयाच्या पंच्याहत्तरीतही घाम गाळून जगणाऱ्या माणसाला आजोबा तर कसं म्हणायचं !
त्या तरूणाला सायकल चोरीला गेल्यामुळे खूप टेन्शन आलं, ही हकिकत कानी पडताचं, संभाजी ब्रिगेडचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष शाम कदम यांना समजली. कदम यांनी तात्काळ त्या आजोबांची भेट घेतली, त्यांना धीर दिला. जुळे सोलापूर ते एमआयडीसी हा रस्त्यावर बस सेवा नसल्याकारणाने रिक्षासाठी रोज शंभर-दीडशे रुपये खर्च होतात, त्यामुळे ते अत्यंत हवालदिल होऊन आभाळ फाटल्यागत रडत होते.
त्या आजोबांना नक्कीच आपण एक सेकंड हॅन्ड सायकल घेऊन द्यावी, असा विचार मनात आला, म्हणून कदम यांनी त्यांच्या मदतीसाठी त्यांच्या ग्रुपवर ही पोस्ट केली. तात्काळ आपल्यासारख्यांनी मान्यवरांनी दोन दिवसात साडेतीन हजार रुपये मदत जमा केली, पण त्या आजोबांच्या गुडघ्याच्या प्रॉब्लेम असल्याकारणाने नवीनच सायकल घेऊन देण्याचे ठरले. सहा हजार रुपये देऊन नवीनच सायकल आज त्या आजोबा-आजींच्या स्वाधीन केली. या मदतीमुळे उभयतांनी भावुक होऊन कृतज्ञता व्यक्त केली.
आपल्या सर्वांचेच व संभाजी ब्रिगेडच्या पदाधिकाऱ्यांचे आभार मानले. त्यांचा चेहऱ्यावरचा जो आनंद पाहून आपल्याकडून जी मदत मिळाली, ती मदत खरेच अनमोल होती.